इराणमधील जहालमतवाद्यांकडून इस्रायलवर हल्ले चढविण्याची मागणी

इराणमधील जहालमतवाद्यांकडून इस्रायलवर हल्ले चढविण्याची मागणी

तेहरान – अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांच्या हत्येनंतर खवळलेल्या इराणमधून जहाल प्रतिक्रिया उमटत आहेत. या हत्येचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या इराणी निदर्शकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे फोटो पेटवून आपला असंतोष व्यक्त केला. त्याचबरोबर, ‘अमेरिकेवर हल्ले चढवा’, ‘अमेरिकेला कुठलीही सवलत देऊ नका’, ‘सुलेमानी आणि फखरीझादेह यांची हत्या करणाऱ्यांना लष्करी प्रत्युत्तर द्या’, ‘इस्रायलला अद्दल घडवा’, अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या. इराणमधील माध्यमांमध्ये देखील फखरीझादेह यांच्या हत्येचे पडसाद उमटले असून इस्रायलच्या ‘हैफा’ या बंदरावर हल्ला चढविण्याची मागणी इराणी वर्तमानपत्रे करीत आहेत.

इस्रायलवर हल्ले

शुक्रवारी राजधानी तेहरानजवळच्या गावात अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या घडविली. फखरीझादेह यांचे हल्लेखोर अद्याप सापडलेले नाहीत. पण इराणच्या अणुकार्यक्रमातील महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांची हत्या घडविणारे तसेच काही महिन्यांपूर्वी नातांझ अणुप्रकल्पात स्फोट घडविणारे एकच आहेत. इस्रायलनेच हे सारे घडविले, असा आरोप इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी यांनी केला. इराणच्या नेत्यांनी देखील अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशावरुन इस्रायलने फखरीझादेह यांची हत्या घडविल्याचे आरोप केले आहेत.

फखरीझादेह यांच्या हत्येवर इराणमधून जहाल प्रतिक्रिया उमटत असून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌समधील ‘बसिज मिलिशिया’च्या कट्टरपंथियांनी इराणच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निदर्शने काढली आहेत. इराणमधील राजवटीशी एकनिष्ठ असलेली इराणी जनता या निदर्शनात सहभागी होत असून इस्रायल व अमेरिकेचे ध्वज तसेच अमेरिकेच्या नेत्यांच्या फोटोची जाळपोळ केली जात आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या निदर्शनात कट्टरपंथियांनी, ‘यापुढे अमेरिकेसमोर नमते घेऊ नका. अमेरिकेला सवलतीही देऊ नका. अमेरिकेच्या विरोधात फक्त युद्ध पुकारा’, अशा घोषणा दिल्या.

इस्रायलवर हल्ले

‘इराणचे शांत राहणे म्हणजे आणखी काही हत्यांना परवानगी देण्यासारखे आहे’, अशा घोषणांद्वारे इराणच्या रोहानी सरकारकडे अधिक आक्रमक भूमिका स्वीकारण्याची मागणी केली. तर ‘युनियन ऑफ इस्लामिक स्टुडंट सोसायटीज्‌’ या इराणमधील प्रभावी संघटनेने रोहानी सरकारला लष्करी कारवाईचा पर्याय सुचविला. मेजर जनरल कासेम सुलेमानी आणि फखरीझादेह यांची हत्या घडविणाऱ्यांना लष्करी कारवाईद्वारे उत्तर द्यायलाच हवे, अशी मागणी या संघटनेने केली. जानेवारी महिन्यात अमेरिकेने इराकमध्ये चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात कासेम सुलेमानी यांची हत्या झाली होती. यानंतर इराणकडून घणाघाती प्रत्युत्तराची अपेक्षा होती. पण इराणने युद्ध भडकणार नाही, याची दक्षता घेऊन यावर जहाल प्रतिक्रिया दिली नव्हती.

पण आता इराणमधील ‘कायहान’ या वर्तमानपत्राने इस्रायलचे व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘हैफा’वरच हल्ला चढविण्याचे सुचविले आहे. इराणच्या लष्कराने हैफा नष्ट करणारा आणि प्रचंड प्रमाणात जीवितहानी करणारा हल्ला चढवावा, अशी जहरी मागणी या वर्तमानपत्राने केली. आतापर्यंत सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांना इराणने पाहिजे तसे प्रत्युत्तर दिलेले नाही. म्हणूनच इस्रायलची हे धाडस केले. पण इराणने आता हैफावर नक्की हल्ला चढवावा. इराणच्या या हल्ल्याला इस्रायल किंवा अमेरिकेकडून कुठलाही विरोध होणार नाही. कारण या दोन्ही देशांकडे इराणविरोधी युद्धाची तयारीच नाही, असा दावा या वर्तमानपत्राने केला.

इस्रायलचे हैफा शहर हे आधीपासूनच इराण तसेच लेबेनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाहच्या निशाण्यावर आहे. हैफा शहरातील अमोनियम नायट्रेटच्या गोदामांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवून मोठा विध्वंस घडविण्याची धमकी हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला याने काही महिन्यांपूर्वीच दिली होती.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info