बायडेन सत्तेवर आल्यावर इराण सुलेमानींच्या हत्येचा सूड घेईल – इस्रायलच्या माजी सुरक्षा अधिकार्‍यांचा इशारा

तेल अविव – कासेम सुलेमानी या आपल्या नेत्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण आसुसलेला आहे. ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर इराण सुलेमानीच्या हत्येचा सूड घेईल. यासाठी इराण थेट इस्रायल किंवा जगभरातील इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य करील, असा इशारा इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ तसेच इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलच्या माजी प्रमुखांनी दिला. इराण तसेच इराक, येमेन किंवा लेबेनॉनमधून इस्रायलवर क्रूझ् किंवा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्लेही चढविले जाऊ शकतात, असा दावा या माजी प्रमुखांनी केला.

इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्यावर अमेरिकेने ड्रोन हल्ला चढवून केलेल्या कारवाईला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याची तसेच अमेरिकेला त्याच्या गंभीर परिणामांची धमकी इराणने दिली होती. या वर्षभरात इराणसंलग्न दहशतवादी गटांनी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्लेही चढविले. पण इराणने अद्याप सुलेमानीच्या हत्येचा सूड घेतलेला नाही. त्यामुळे इराणकडून मोठा घातपात घडविला जाण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे माजी प्रमुख शाबताई शावित, डॅनी याटोम आणि राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलचे माजी प्रमुख गिओरा यिलँड यांनी दिला.

यासाठी शावित यांनी अर्जेंटिनामधील इस्रायलचे दूतावास आणि सांस्कृतिक केंद्रावर इराणने चढविलेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. १९९२ आणि १९९४ साली इराणने हिजबुल्लाह या आपल्या दहशतवादी संघटनेचा वापर करून अर्जेंटिनातील इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य केले होते. पुढच्या काळातही इराण असेच हल्ले चढवू शकतो. थेट इस्रायल किंवा इस्रायलच्या हितसंबंधांवर हल्ले चढविण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या हस्तकांचा वापर करील. सदर हल्ल्यांमध्ये आपल्यावर थेट आरोप होणार नाही, याची काळजी इराण घेईल, असा दावा शावित यांनी केला.

तर ‘सुलेमानीच्या हत्येमुळे इराणला जबर हादरा बसला आहे. इराण आणि कुद्स फोर्स अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. येत्या काळात कुद्स फोर्स पहिल्यासारखी आक्रमक असेल का, हे सांगता येणार नाही. पण इस्रायल आणि अमेरिकेचे ‘हाय वॅल्यू टार्गेट’ लक्ष्य करण्याचे इराणचे लक्ष्य असेल’, असा दावा ‘मोसाद’चे आणखी एक माजी प्रमुख डॅनी याटोम यांनी केला. तर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथग्रहण कार्यक्रमाला अवघे काही दिवस शिल्लक असताना इराण अमेरिका किंवा इस्रायलवर थेट किंवा अप्रत्यक्ष हल्ले चढविणे इस्रायलच्या हिताचे नसेल, असे इलँड यांनी सांगितले.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा काही नेम नाही. त्यामुळे बायडेन यांनी अमेरिकेची सत्ता हाती घेतल्यावर जगभरातील इराणचे हस्तक, इराणसंलग्न दहशतवादी संघटना, कट्टरपंथी इस्रायलच्या हितसंबंधांना लक्ष्य करतील. कारण इस्रायलवर थेट हल्ले चढविणे इराण तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना शक्य नसल्याचा दावा इलँड यांनी केला. असे असले तरी इराणला कमी लेखता येणार नाही. सुलेमानी याचा सूड घेण्यासाठी इराण इराक, येमेन किंवा लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांहून इस्रायलवर क्रूझ् आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवू शकतो, असा इशारा इलँड यांनी दिला.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी इराणमध्ये अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या झाली होती. आपल्या अणुशास्त्रज्ञाच्या हत्येनंतर संतापलेल्या इराणने इस्रायलवर भीषण हल्ले चढविण्याची धमकी दिली होती. मात्र, अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे माजी प्रमुख जॉन ब्रेनन यांनी इराणला संयम राखण्याचा सल्ला दिला होता. अमेरिकेत जबाबदार सत्ताबदल होईपर्यंत कुठलीही चूक करू नका, असे ब्रेनन यांनी इराणला बजावले होते. इराणच्या लष्करी अधिकार्‍यांनी देखील ट्रम्प सत्तेतून बाहेर पडल्यानंतर सुलेमानी यांच्या हत्येचा पूर्ण सूड घेण्यात येईल, अशा धमक्या दिल्या होत्या.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info