नातांझ अणुप्रकल्पावर हल्ला चढविणार्‍या इस्रायलचा इराण सूड घेणार – इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ

नातांझ अणुप्रकल्पावर हल्ला चढविणार्‍या इस्रायलचा इराण सूड घेणार – इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ

तेहरान – रविवारी इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या ब्लॅकआऊटसाठी इस्रायलच जबाबदार आहे. इस्रायलचा हा हल्ला म्हणजे आण्विक दहशतवाद असून इराण याचा सूड नक्की घेईल, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी दिला. दरम्यान, या हल्ल्यामुळे नातांझ प्रकल्पातील अणुकार्यक्रम नऊ महिन्यांनी मागे गेल्याचा दावा अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला आहे. पण यामुळे अणुकार्यक्रमाचे फार मोठे नुकसान झालेले नसून लवकरच इथे अतिप्रगत सेंट्रिफ्यूजेस बसविणार असल्याची घोषणा इराणने केली आहे.

नातांझ

इराणच्या अणुकार्यक्रमासाठी युरेनियम संवर्धन आणि प्रगत सेंट्रिफ्यूजेसवर प्रक्रिया करण्याची सुविधा असलेल्या नातांझ या प्रकल्पाचा रविवारी पहाटे वीजपुरवठा खंडीत झाला होता. इराणच्या अणुऊर्जा आयोगाने हा एक अपघात असल्याचे सांगून इस्रायलला दोषी धरण्याचे टाळले होते. पण सोमवारी सकाळी इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना नातांझ प्रकल्पाला आण्विक दहशतवादाने लक्ष्य केल्याचा ठपका ठेवला.

‘व्हिएन्ना येथील चर्चेतून इराण निर्बंधमुक्त होणार आहे. नेमके हेच इस्रायलला नको आहे. इराणला निर्बंधमुक्त होऊ देणार नाही, अशी घोषणा इस्रायलच्या नेत्यांनी याआधी केली होती. म्हणूनच इराणला चिथावणी देण्यासाठी इस्रायलने नातांझवर हल्ला चढविला. पण इराण इस्रायलच्या या हल्ल्याचा सूड घेईल’, अशी धमकी परराष्ट्रमंत्री झरिफ यांनी दिली. इराणला निर्बंधांत अडकवून ठेवण्यासाठी इस्रायलने केलेले प्रयत्न अपयशी ठरल्याची टीका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी केली.

नातांझवरील या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताची ओळख पटली आहे. अद्याप या संशयिताला अटक झाली नसून इराणचे स्पेशल फोर्सेस यासाठी प्रयत्न करीत असल्याचा दावा इराणच्या सरकारसंलग्न संकेतस्थळाने केला. नातांझ अणुप्रकल्पावरील हल्ल्यासाठी इस्रायलची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ जबाबदार असल्याचा आरोप इस्रायली माध्यमाने पाश्‍चिमात्य गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने केला.

इस्रायलच्या सरकारने या घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण शत्रूदेशांना आता इस्रायलच्या सामर्थ्याची जाणीव होत असेल, असे सूचक विधान इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख अविव कोशावी यांनी केले.

रविवारच्या हल्ल्यामुळे इराणच्या अणुप्रकल्पातील युरेनियम संवर्धनाची क्षमता नऊ महिन्यांनी मागे गेली आहे. याचा थेट परिणाम इराणच्या अणुकार्यक्रमावर होत असल्यामुळे तो देखील नऊ महिने मागे पडल्याचा दावा अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या वर्तमानपत्राने केला. इराणच्या अणुकार्यक्रमाला हादरे देण्यासाठीच हा हल्ला झाला होता, असे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे. पण इराणने हे दावे फेटाळले आहेत. तसेच अणुप्रकल्पातील जुने सेंट्रिफ्यूजेस काढून त्याजागी प्रगत सेंट्रिफ्यूजेस बसविण्यात येतील, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, याआधी २०१० साली याच अणुप्रकल्पावर झालेल्या स्टक्सनेट व्हायरसच्या सायबर हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पातील हजाराहून अधिक सेंट्रिफ्यूजेस नष्ट झाले होते. यामुळे इराणचा अणुकार्यक्रम पिछाडीवर गेला होता. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून स्टक्सनेटचा सायबर हल्ला घडविल्याचा आरोप इराणने केला होता. यावेळी अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणबरोबर वाटाघाटी करीत असून लवकरच या प्रयत्नांना यश मिळेल, असे संकेत बायडेन प्रशासनाकडून सातत्याने दिले जात आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info