हमासने रॉकेट हल्ले न थांबविल्यास इस्रायल गाझापट्टीचा ताबा घेईल – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

हमासने रॉकेट हल्ले न थांबविल्यास इस्रायल गाझापट्टीचा ताबा घेईल – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

तेल अविव – ‘हमासचे रॉकेट हल्ले रोखण्यासाठी इस्रायलचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तरीही हे हल्ले थांबणार नसतील, तर इस्रायल गाझापट्टीचा ताबा घेऊ शकतो’, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. त्याचबरोबर हा संघर्ष कधी संपेल, हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटलेे आहे. सुमारे 70 परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इस्रायलच्या पंतप्रधानांनी गाझातील हमास, इस्लामिक जिहाद व इतर दहशतवादी संघटनांसह त्यांची पाठराखण करणाऱ्यांना हा इशारा दिला.

गाझापट्टीचा ताबा

इस्रायल आणि गाझातील दहशतवादी संघटनांमध्ये पेटलेळ्या गेल्या नऊ दिवसांच्या संघर्षात 212 पॅलेस्टिनींचा बळी गेल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना करीत आहेत. तर आपल्या हवाई हल्ल्यांमध्ये 160 हून अधिक हमास व इस्लामिक जिहादचे दहशतवादी ठार झाल्याचे इस्रायलचे लष्कर सांगत आहे. हमासने प्रक्षेपित केलेली पण गाझाची सीमा ओलांडू शकली नाहीत, अशा रॉकेट्‌समुळे पॅलेस्टिनींचा बळी गेला, असा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. तसेच हमासने गाझातील जनतेचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा इस्रायलची लष्कराचा आरोप आहे.

काही तासांपूर्वी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 11 जणांचा बळी गेला असून यात आठ मुलांचा समावेश असल्याचा आरोप हमास तसेच इराण, तुर्की हे देश करीत आहेत. पण या पॅलेस्टिनींच्या बळीसाठी हमासचे रॉकेट्स जबाबदार होते, अशी माहिती इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल योनाथन काँक्रियस यांनी दिली. या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बुधवारी परदेशी राजनैतिक अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारांची एक बैठक आयोजित केली होती.

यात पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायली लष्कराचे गाझातील हल्ले अतिशय नेमके आणि हमासला लक्ष्य करणारे होते, असे ठणकावून सांगितले. पॅलेस्टिनींनी इमारत किंवा संबंधित ठिकाण सोडल्यानंतरच आपल्या लष्कराने कारवाई केली व त्याचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध केल्याची आठवण पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी करुन दिली. याउलट हमासचे रॉकेट हल्ले इस्रायलमधील सामान्य जनतेला लक्ष्य करीत आहेत. मंगळवारच्या हल्ल्यात दोन थाई नागरिकांचा गेलेला बळी, हे याचे धडधडीत उदाहरण ठरते, असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे हमास खऱ्या अर्थाने खुनी असल्याचा आरोप नेत्यान्याहू यांनी केला.

गाझापट्टीचा ताबा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष कधी संपणार, असे यावेळी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना विचारले. ‘इस्रायलचे लष्कर हातात स्टॉपवॉच घेऊन युद्ध लढत नाही. आम्ही निश्‍चित अशी उद्दिष्टे समोर ठेवून ही मोहीम सुरू केली आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय कारवाई थांबणार नाही. याआधीचा संघर्ष दीर्घकाळ चालला होता. तेव्हा आत्ताचा संघर्ष याच दिवशी संपेल, असे सांगता येणार नाही’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले.

‘इस्रायलवर हजारो रॉकेट हल्ले चढविणाऱ्या हमासविरोधात इस्रायलची कारवाई सुरू आहे. हवाई हल्ल्यांद्वारे हमासचे सामर्थ्य क्षीण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण यानंतरही हमासचे रॉकेट हल्ले थांबणार नसतील, तर मग इस्रायल गाझाचा ताबा घेऊ शकेल’, असा इशाराच नेत्यान्याहू यांनी दिला. बुधवारी सकाळी हमासने इस्रायलच्या तेल नोफ हवाईतळावर रॉकेट हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलचे नुकसान झाले नाही. पण यानंतर इस्रायलने गाझातील हमासच्या ठिकाणांवर जोरदार कारवाई केली. हमासचा वरिष्ठ नेता मोहम्मद दईफ हा इस्रायलच्या निशाण्यावर असल्याच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, सिरियातील अल कायदा संलग्न हुरास अल-दीन या संघटनेने गाझातील कट्टरपंथियांना इस्रायलविरोधात संघर्ष करण्याची चिथावणी दिली आहे. तर जगभरात जिथे कुठे इस्रायली दिसतील, त्यांच्यावर हल्ले चढवा, अशी धमकी अल कायदा संघटनेने दिली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info