चीनचे आक्रमण थोपवण्यासाठी अमेरिकेने तैवानला गुरिला युद्धासाठी तयार करावे – पेंटॅगॉनच्या स्पेशल फोर्सेसचे अधिकारी

चीनचे आक्रमण थोपवण्यासाठी अमेरिकेने तैवानला गुरिला युद्धासाठी तयार करावे – पेंटॅगॉनच्या स्पेशल फोर्सेसचे अधिकारी

वॉशिंग्टन/तैपेई – ‘अमेरिकेने आपल्या लष्कराचे कमांडोज् तैवानमध्ये पाठवून चीनच्या हल्ल्याचा सामना कसा करावा, याचे प्रशिक्षण द्यावे. चीन तैवानवर हल्ल्याची तयारी करीत असताना, या देशाने विचारही केला नसेल, अशी पावले उचलून अमेरिकेने चीनला धक्का देण्याची गरज आहे’, असे ख्रिस्तोफर मायर यांनी सुचविले आहे. अमेरिकी संरक्षणदलांच्या स्पेशल ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणूनच ख्रिस्तोफर मायर यांचे नाव चर्चेत आहे. म्हणूनच त्यांनी दिलेला हा सल्ला लक्षवेधी ठरतो आहे.

चीनचे आक्रमण

तैवानच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी अमेरिकेने गांभीर्याने प्रयत्न करायला हवे. चीन आणि तैवानच्या लष्करी क्षमतेची तुलना होऊ शकत नाही. म्हणून स्पेशल ऑपरेशन फोर्सेसचे सहाय्य घेऊन आपण तैवानच्या क्षमतेत वाढ करू शकतो’, असे मायर यांनी अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटीसमोर बोलताना सुचविले. चीन अ‍ॅम्फिबियस युद्धनौकांचा वापर करून तैवानवर हल्ला चढवू शकतो, अशी चिंता मायर यांनी व्यक्त केली.

चीनचे आक्रमण

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या मरिन्सचे पथक तैवानमध्ये उतरले होते. अमेरिकी मरिन्सनी तैवानच्या जवानांना प्रशिक्षण दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांनी हे दावे नाकारले होते. पण तैवानच्या माध्यमांनीच अमेरिकी मरिन्स उतरल्याचे म्हटले होते. यानंतर चीनच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी संताप व्यक्त करून तैवानचा ताबा घेण्याच्या धमक्या दिल्या होत्या. मायर यांनी सिनेटसमोर ठेवलेल्या तैवानबरोबरच्या लष्करी सहकार्याप्रमाणे राजनैतिक आघाडीवर सहकार्य वाढविण्यासाठीचा प्रस्ताव अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात सादर केला. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर स्टिव्ह शॅबॉत आणि डेमोक्रॅट पक्षाचे सिनेटर ब्रॅड शर्मन यांनी सादर केलेल्या संयुक्त प्रस्तावात अमेरिकेतील तैवानी प्रतिनिधींचे अधिकारात वाढ करण्याचच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे.

चीनचे आक्रमण

अमेरिकेतील तैवानच्या प्रतिनिधी कार्यालयाची ओळख ‘तैवान काऊन्सिल फॉर युएस अफेअर्स’, अशी आहे. पण यापुढे तैवानबरोबरच्या सहकार्याला महत्त्व देण्यासाठी सदर कार्यालयाचे नाव ‘तैवान रिप्रेझेन्टेशन ऑफिस’ असे करावे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला तैवानच्या प्रतिनिधींबरोबर सहकार्य करण्यास सोपे जाईल, असे शॅबॉत आणि शर्मन यांचे म्हणणे आहे. सदर प्रस्ताव चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’ला हादरा देणारा असल्याचा दावा तैवानी माध्यमे करीत आहेत. यामुळे अमेरिका व तैवानमधील संबंध अधिक दृढ होतील, असे या माध्यमांचे म्हणणे आहे. यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

दरम्यान, पश्‍चिम पॅसिफिक महासागरातील किरिबाती या बेटदेशात चीनने उभारलेले हवाईतळ अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकते, असा इशारा तैवानमधील लष्करी विश्‍लेषक चँग जुंग-मिंग यांनी दिला. दुसर्‍या महायुद्धात वापरलेले हवाईतळाची डागडूजी करून चीन याचा वापर अमेरिकेच्या या क्षेत्रातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी करू शकतो, असे चँग यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या हवाई बेटापासून किरिबाती सुमारे 1,864 सागरीमैल इतक्या अंतरावर आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info