बायडेन यांच्या कमकुवतपणामुळे हमासने इस्रायलवर हल्ले केले – इस्रायल दौर्‍यावर असलेल्या अमेरिकी सिनेटर्सचा आरोप

बायडेन यांच्या कमकुवतपणामुळे हमासने इस्रायलवर हल्ले केले – इस्रायल दौर्‍यावर असलेल्या अमेरिकी सिनेटर्सचा आरोप

तेल अविव – ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दाखविलेल्या कमकुवतपणामुळे हमासने इस्रायलवर हल्ले चढविण्याची हिंमत दाखविली. हमास किंवा हिजबुल्लाह व इराणबाबत बायडेन यांनी अशीच भूमिका कायम ठेवली तर पुढच्या काळात असे अनेक दहशतवादी हल्ले पहायला मिळतील’, अशी जळजळीत टीका अमेरिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी केली.

इस्रायलवर हल्ले

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या चार नेत्यांनी नुकताच इस्रायलचा दौरा केला. यामध्ये टेड क्रूझ, लिंडसे ग्रॅहम आणि बिल हॅगर्टी यांचा समावेश होता. या सिनेटर्सनी यावेळी हमासने इस्रायलवर चढविलेल्या हल्ल्यांमध्ये झालेल्या हानीची पाहणी केली. तसेच इस्रायलला आपले पूर्ण समर्थन असल्याची ग्वाही या सिनेटर्सनी दिली. कडवे इस्रायल समर्थक म्हणून ओळख असलेल्या क्रूझ यांनी अ‍ॅश्खेलॉन येथील घरांची पाहणी करून त्याचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. तसेच हमासने इस्रायलवर चढविलेल्या या भीषण रॉकेट हल्ल्यांसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे कमकुवत नेतृत्व जबाबदार असल्याचा ठपका क्रूझ यांनी ठेवला.

हमासचे दहशतवादी इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव करीत असताना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलला संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले. यामुळे हमासच्या दहशतवादी नेत्यांना अधिक चेव चढला’, असा घणाघात क्रूझ यांनी केला. बायडेन यांच्या या कमजोर नेतृत्वामुळे हमासप्रमाणे हिजबुल्लाह किंवा इराणलाही बळ मिळून ते देखील दहशतवादी हल्ले चढवू शकतात, असा इशारा क्रूझ यांनी दिला. त्याचबरोबर गाझातील पॅलेस्टिनींना देण्यात येणारे अर्थसहाय्य हमासच्या हाती जाणार असेल तर अमेरिकेने पॅलेस्टिनींना आर्थिक मदत पुरवू नये, असे सांगून क्रूझ यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले.

इस्रायलवर हल्ले

क्रूझ यांच्याबरोबर इस्रायलच्या दौर्‍यावर आलेल्या वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी इस्रायल अमेरिकेचे डोळे आणि कान असल्याचे विधान केले. ‘इस्रायलमधील आमच्या या मित्रांपेक्षा इतर कोणताही देश अमेरिकेवरील कट्टरपंथियांचे हल्ले रोखण्यासाठी सहकार्य करीत नाही’, असे सांगून ग्रॅहम यांनी इस्रायलचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच हमासच्या विरोधात वापरलेल्या इसरायलच्या आयर्न डोम यंत्रणेसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रॅहम यांनी स्पष्ट केले.

क्रूझ, ग्रॅहम आणि हॅगर्टी यांच्याप्रमाणे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी देखील इस्रायलला भेट दिली होती. पॉम्पिओ यांच्या या भेटीबाबत फारशी चर्चा झाली नाही. इस्रायलचे मुख्य गुप्तचर यंत्रणा मोसादचे माजी प्रमुख योसी कोहेन यांची भेट घेण्यासाठी पॉम्पिओ तेल अविवमध्ये दाखल झाले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info