तुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशारा

तुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशारा

चिथावणी

अथेन्स – तुर्कीने एखाद्या शत्रूप्रमाणे चिथावणीखोर कारवाया करणे सुरू ठेवले तर तुर्कीवर निर्बंध लादण्यासाठी ग्रीस अधिक आक्रमक पावले उचलेल, असा इशारा ग्रीसचे परराष्ट्रमंत्री निकॉस डेन्दिआस यांनी दिला. पुढील आठवड्यात होणार्‍या नाटोच्या बैठकीत ग्रीस व तुर्कीचे नेते परस्परांची भेट घेतील, असे संकेत देण्यात आले आहेत. या भेटीपूर्वी तुर्कीकडून पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्ये सुरू झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर ग्रीसने तुर्कीला समज दिल्याचे दिसते.

तुर्कीच्या चिथावणीला निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर देण्याचा ग्रीसचा इशाराभूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनसाठ्यांच्या मुद्यावरून ग्रीस व तुर्कीमध्ये सध्या तणाव आहे. तुर्कीने ग्रीसनजिकच्या सागरी क्षेत्रात इंधन उत्खनन तसेच संशोधनासाठी जहाजे पाठवून ग्रीसला चिथावणी दिली होती. त्याविरोधात ग्रीसनेही आक्रमक भूमिका घेतली असून आपली संरक्षणसज्जता वाढविण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी भूमध्य सागरी क्षेत्रात ग्रीस व तुर्कीमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र अमेरिका व युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने संघर्ष टळला होता. संघर्ष टळला असला तरी दोन देशांमधील तणाव अजूनही कायम आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/greece-warns-turkey-it-will-push-for-sanctions-if-tensions-persist/