सिरियामध्ये अमेरिकेच्या ताब्यातील इंधनप्रकल्पावर दहशतवाद्यांचे हल्ले

दमास्कस – सिरियाच्या देर अल-झोर प्रांतात अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंधनप्रकल्पावर जोरदार रॉकेट हल्ले झाले. काही तासांपूर्वी अमेरिकेने सिरिया व इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या तळांवर हवाई हल्ले चढविले होते. त्याला इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने दिलेले हे प्रत्युत्तर असल्याचा दावा केला जातो.

रविवारी संध्याकाळी अमेरिकेने सिरिया व इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले चढविले होते. यात हिजबुल्लाहचा कमांडर तसेच इराणच्या लष्कराचे काही जवानांचा ठार झाल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यांसाठी अमेरिकेने इस्रायलचे सहाय्य घेतले होते, असा दावा केला जातो. इराकमधील अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य करणार्‍या इराणसंलग्न दहशतवाद्यांना या हल्ल्यांद्वारे इशारा दिल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते.

पण पुढच्याच दिवशी सिरियातील अमेरिकेच्या ताब्यातील इंधनप्रकल्पावर हल्ले चढवून इराणसंलग्न दहशतवाद्यांनी या हल्ल्याला उत्तर दिले. सिरियाच्या देर अल-झोर येथील मयादीन शहरातील अल-ओमर इंधनप्रकल्पावर पाच रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये सदर प्रकल्पाचे किती नुकसान झाले, याचे तपशील उघड होऊ शकलेले नाहीत. पण या हल्ल्यांद्वारे इराणसंलग्न संघटनांनी अमेरिकेला आपली ताकद दाखवून दिल्याचे दिसत आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/terrorist-attacks-on-us-controlled-fuel-plant-in-syria/