निर्वासितांचा शस्त्रासारखा वापर करणार्‍या देशांवर युरोपिय महासंघाने कारवाई करावी – ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची मागणी

युरोपिय महासंघाने कारवाई

ब्रुसेल्स – तुर्की, बेलारुस, अफगाणिस्तान यासारखे देश निर्वासितांचा शस्त्र म्हणून वापर करीत आहेत. त्याविरोधात युरोपिय महासंघाने कारवाई करावी, अशी आग्रही मागणी ऑस्ट्रियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. बु्रसेल्समध्ये महासंघाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होत असून, या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॉलनबर्ग यांनी हे वक्तव्य केले. तुर्कीकडून यापूर्वी सातत्याने निर्वासितांचे लोंढे घुसविण्याची धमकी देण्यात आली असून गेल्या काही आठवड्यांमध्ये बेलारुसमधूनही निर्वासितांची घुसखोरी वाढल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रियन मंत्र्यांची मागणी महत्त्वाची ठरते.

‘तुर्की, बेलारुस व अफगाणिस्तान यासारखे देश निर्वासितांचा वापर युरोपिय महासंघाविरोधात शस्त्रासारखा करु पहात आहेत. महासंघाने याची जाणीव ठेऊन पुढील पावले उचलायला हवीत. महासंघ व युरोपिय कमिशनने या मुद्यावर जागे होण्याची गरज आहे. महासंघ व संबंधित यंत्रणांनी आर्थिक, राजकीय अथवा व्यापारी पातळीवर जी कारवाई शक्य आहे, ती करण्यासाठी हालचाली सुरू करायला हव्यात’, अशी मागणी ऑस्ट्रियाचे परराष्ट्रमंत्री अलेक्झांडर शॉलनबर्ग यांनी केली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/european-union-should-take-action-against-countries-that-use-refugees-as-weapons/