उद्योगक्षेत्रावरील चीनची कारवाई या देशाच्या आर्थिक महासत्तापदासाठी धोकादायक ठरेल – अमेरिकी विश्‍लेषकांचा इशारा

चीनची कारवाई

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने आपल्याच मोठ्या कंपन्यांविरोधात सुरू केलेली कारवाई, आर्थिक महासत्ता म्हणून असलेल्या चीनच्या स्थानाला धक्का देणारी ठरते, असा इशारा अमेरिकी विश्‍लेषक रॉन इन्साना यांनी दिला आहे. चीन जगातील दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून ते स्थान मिळविण्यासाठी कारणीभूत ठरलेले ‘बिझनेस मॉडेल’च सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने धोक्यात आणल्याचे इन्साना यांनी बजावले आहे. जगभरातील चिनी कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण सुरू असून चार आघाडीच्या कंपन्यांना अवघ्या महिन्याभरात 300 अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसला आहे.

रॉन इन्साना हेज फंडचे माजी व्यवस्थापक व पत्रकार असून ‘सीएनबीसी’ वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात त्यांनी चिनी राजवटीच्या कारवाईवर टीकास्त्र सोडले आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने सुरू केलेल्या कारवाईमुळे चीनमधून परदेशी भांडवला मोठ्या प्रमाणात बाहेर जाण्यास सुरुवात होईल, असे इन्साना यांनी बजावले. गेल्या काही दशकात चीनमधील लाखो नागरिक गरीबीतून बाहेर पडले असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. यामागे बड्या चिनी कंपन्या, त्यांची कामगिरी, शेअरबाजारातील गुंतवणूक हे घटकही कारणीभूत आहेत. त्याला धक्का लागला तर त्याने चिनी नागरिकांचा आत्मविश्‍वास डळमळीत होईल, याकडे अमेरिकी विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/chinas-action-in-the-industrial-sector-would-be-dangerous-for-the-countrys-economic-superpower/