तालिबानचे अनुकरण करून चीनला तैवानचा ताबा मिळवायचा आहे

तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

तैपेई/बीजिंग – तालिबान या संघटनेने गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानवर ज्याप्रमाणे ताबा मिळविला त्याचे अनुकरण करून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला तैवान गिळंकृत करायचा आहे, असा आरोप तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु यांनी केला आहे. हा आरोप करतानाच तैवानकडे आपले संरक्षण करण्याची इच्छाशक्ती व साधने दोन्ही आहेत, असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे.

गेल्या रविवारी तालिबानसमोर शरणागती पत्करून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असून बहुसंख्य अनेक राजकीय नेत्यांसह विश्‍लेषक व तज्ज्ञांनी अमेरिकेच्या निर्णयावर टीकेची झोड उठविली आहे. काही विश्‍लेषकांनी अफगाणिस्तानमधील माघारीने अमेरिकेने इतर देशांना अडचणीत आणल्याचा दावा करीत त्यात तैवानसारख्या देशांचाही समावेश असल्याचा उल्लेख केला होता.

तालिबानचे अनुकरण

अमेरिकेचा अफगाणिस्तानात झालेला पाडाव चिनी प्रसारमाध्यमे व सोशल मीडियानेही उचलून धरला होता. चीनच्या प्रसारमाध्यमांनी अफगाणिस्तानची तुलना करताना तैवानला लक्ष्य केले.‘स्ट्रेट हेराल्ड’ या दैनिकाने तैवानला, अमेरिकेवर जास्त विश्‍वास टाकू नका, अफगाणिस्तानची स्थिती बघा, असे बजावले होते. ‘चायना अफेअर्स’ या वेबसाईटने, येत्या काळात तैवान क्षेत्रात युद्ध सुरू झाले तर अमेरिका तैवानलाही सोडून पळ काढेल, असा टोला लगावला होता. तर, अफगाणिस्तानमधील अमेरिकेची माघार तैवानमधील सत्ताधाऱ्यांसाठी धडा असून, त्यांनी अमेरिकेचे प्यादे होणे टाळावे, अशी धमकी ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राने दिली होती. त्यानंतर मंगळवारपासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवाननजिकच्या क्षेत्रात ‘लाईव्ह फायर ॲसॉल्ट ड्रिल्स’ सुरू केल्याचे समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर, तैवानच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला होता. अमेरिकेने तैवानला आश्‍वस्त केल्याचे सांगण्यात येत असले तरी चीनचा आक्रमक सूर अद्याप कायम आहे. त्यामुळे तैवाननेही आता आक्रमक भूमिका घेतल्याचे परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी, चीन तालिबानचे अनुकरण करून तैवानवर ताबा मिळविण्याचे स्वप्न रंगवित असल्याचा आरोप केला. मात्र चीचे हे स्वप्न पूर्ण होणार नसून, तैवानकडे स्वतःच्या सुरक्षेसाठी इच्छाशक्ती व शस्त्रे दोन्ही उपलब्ध आहेत, असे परराष्ट्रमंत्री वू यांनी बजावले. गेल्या वर्षभरात अमेरिकेने तैवानला मोठ्या प्रमाणावर शस्त्रसहाय्य पुरविण्याबाबत करार केले असून त्यात लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, तोफा यांचा समावेश आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला तैवानही स्थानिक पातळीवर लढाऊ विमान, युद्धनौका व पाणबुड्या विकसित करीत असल्याचे समोर आले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info