काबुलच्या विमानतळवर दोन आत्मघाती स्फोट – 40 ठार – 120 गंभीर जखमी

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील विमानतळावर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांमध्ये 40 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्या 120 च्या पुढे असून यातील निम्याहून अधिकजणांची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेलेला असताना आणि परदेशी नागरिक व सैनिक अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत असताना झालेल्या या हल्ल्यांमुळे सारे जग हादरले आहे. काही विश्‍लेषकांनी तर या घातपाताची तुलना 9/11च्या हल्ल्याशी केली आहे. मात्र या आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने स्वीकरलेली नाही.

आत्मघाती स्फोट

अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीने अफगाणिस्तानच्या काबुलमधील विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता. हा इशारा प्रत्यक्षात उतरला असून काबुल विमानतळावर दोन आत्मघाती स्फोट घडवून दहशतवाद्यांना साऱ्या जगाला हादरविले. या स्फोटांच्या बळींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. तसेच बळींच्या संख्येबाबतही वृत्तवाहिन्यांमध्ये निरनिराळी माहिती दिली जाते. काबुल विमानतळाच्या ॲब्बे गेटजवळ पहिला स्फोट झाला. यानंतर काही मिनिटातच विमानतळाजवळील बॅरॉन हॉटेलजवळ दुसरा स्फोट झाला. हे दोन्ही आत्मघाती हल्ले होते, अशी माहिती तालिबानकडून दिली जाते. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला.

या दोन्ही स्फोटांच्या मधल्या अंतरात गोळीबार झाल्याची माहिती काही पत्रकारांनी दिली आहे. पण याला दुजोरा मिळू शकलेला नाही. दोन स्फोटांपैकी एक स्फोट आत्मघाती हल्लेखोराने घडविला होता, याची खात्री पटल्याचे अमेरिकेच्या दोघा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच बॅरॉन हॉटेलजवळ झालेला स्फोट अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्यासाठीच घडविण्यात आला, कारण अमेरिकेचे सैनिक या हॉटेलमध्ये वास्तव्य करीत आहेत, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आत्मघाती स्फोट

तर हा स्फोट इथे जमलेल्या गर्दीतच झाल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. याचे भंयकर फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये आले आहेत. यानंतर काबुल विमानतळावर गदारोळ माजला होता. आपल्या नागरिकांना मायदेशी नेण्याच्या गडबडीत असलेल्या अमेरिका व इतर देशांसमोर यामुळे नवे संकट खडे ठाकले आहे. तालिबानने या स्फोटाला अमेरिका व पाश्‍चिमात्य देशच जबाबदार असल्याची टीका केली. यामुळे अफगाणिस्तानातील सुरक्षाविषयक परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अफगाणिस्तानातील आपल्या राजदूतांना मायदेशी बोलवल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या आत्मघाती हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर प्रचंड प्रमाणात दडपण वाढले आहे. काबुलच्या विमानतळावर उसळलेली गर्दी हा बायडेन प्रशासनाच्या बेपर्वाईचा परिणाम असल्याची टीका अमेरिकेत होत आहे. युरोपिय देश यावर नाराजी व्यक्त करीत असून नुकत्याच पार पडलेल्या जी7च्या व्हर्च्युअल बैठकीत याचे पडसाद उमटले होते. 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकन तसेच इतर देशांचे सैन्य व नागरिक मागे घेणे अशक्य आहे, याची जाणीव जी7च्या इतर सदस्य देशांनी बायडेन यांना करून दिली. पण त्यांनी ही मुदत वाढविण्याचे नाकारले आहे.

तालिबानने 31 ऑगस्टनंतर एकही परदेशी सैनिक अफगाणिस्तानात खपवून घेणार नाही, असे धमकावले होते. तालिबानच्या या इशाऱ्याचे बायडेन तंतोतंत पालन करून आपल्या सहकारी देशांना तोंडघशी पाडत असल्याची टीका सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काबुलमधील विमानतळावर झालेले हल्ले अमेरिकेसमोरील नवे आव्हान बनले आहे. तालिबानच्या दहशतीने अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी प्राण पणाला लावणारे हजारो जण काबुलच्या विमानतळावर आपल्या सुटकेची प्रतिक्षा करीत आहेत. यामध्ये परदेशी नागरिकांबरोबरच अफगाणींचाही समावेश आहे. यापुढे अफगाणी नागरिकांना देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही, असे सांगून तालिबानने या विमानतळाबाहेरील अफगाणींना मारझोड करून परत जाण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही जीवाची पर्वा न करता अफगाणी या विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत.

अशा परिस्थितीत आपलै नागरिक व सैनिक मागे घेत असाना या विमानतळाची सुरक्षा करण्याचे आव्हान अमेरिका व इतर देशांना स्वीकारावे लागणार आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info