चलनफुगवटा व महागाईमुळे जगाला 2008 सालाप्रमाणे नव्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागेल – रशियाच्या मध्यवर्ती बँकेचा इशारा

मॉस्को – कोरोना साथीच्या काळातील वाढत्या कर्जाचा बोजा आणि तीव्र महागाई व चलनफुगवटा यामुळे जगाला 2008-09 सालाप्रमाणे पुन्हा भयावह आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा रशियाच्या मध्यवर्ती बँकेने दिला आहे. जगातील अनेक देशांमध्ये महागाई व चलनफुगवट्याची व्याप्ती पुन्हा वाढताना दिसत आहे. अमेरिका व युरोपिय बँकांनी ही तात्पुरती बाब असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र रशियन मध्यवर्ती बँकेने महागाईची तीव्रता दीर्घकाळ कायम राहण्याचे भाकित वर्तविले असून यातूनच 2023 सालच्या आर्थिक संकटाला सुरुवात होईल, असे बजावले.

आर्थिक संकटाला तोंड

गेल्याच महिन्यात जगभरातील प्रमुख वित्तसंस्था व विश्‍लेषकांनी चिनी अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा उल्लेख करून जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा फटका बसेल, असा निष्कर्ष नोंदविला होता. अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनीही कर्जाच्या मर्यादेचा मुद्दा उपस्थित करून अमेरिकेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागेल, असे बजावले आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता रशियाच्या मध्यवर्ती बँकेने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘सेंट्रल बँक ऑफ रशिया’ने नुकत्याच 2022-24 सालासाठी ‘मॉनेटरी पॉलिसी गाईडलाईन्स’ प्रसिद्ध केल्या आहेत. या अहवालात, पुढच्या तीन वर्षातील अर्थव्यवस्थेच्या संभाव्य स्थितीसंदर्भात भाकिते वर्तविण्यात आली आहेत. त्यात कोरोनाची साथ अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवून महागाईचा दर वाढता राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. याच काळात विविध मध्यवर्ती बँकांनी अर्थव्यवस्थांना सहाय्य करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे कर्जाचे ओझे वाढत राहतील, असे बजावण्यात आले आहे. हे कर्जाचे वाढते ओझे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल व त्यातून नवे आर्थिक संकट उद्भवेल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे.

आर्थिक संकटाला तोंड

‘2022 साली जागतिक अर्थव्यवस्था प्रगती करीत असल्याचे दिसेल, मात्र 2023 साली आर्थिक संकटाचा फटका बसेल. हा फटका 2008-2009 साली आलेल्या आर्थिक संकटाइतकाच मोठा असेल’, असे रशियाच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. 2023 साली जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर जेमतेम 1.1 टक्का इतका राहिल, असे रशियन अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी कर्जाच्या वाढत्या ओज्याचा सर्वाधिक फटका उगवत्या अर्थव्यवस्थांना बसेल, असा दावाही यात करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी कोरोनाच्या काळात उद्भवलेल्या स्थितीची तुलना 1929 सालच्या आर्थिक महामंदीशी केली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांनी कोरोनाच्या साथीचे आर्थिक परिणाम पुढील काही दशके सहन करावे लागतील, असे बजावले होते. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यावर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात, युरोपिय देशांना दुहेरी मंदीचा फटका बसेल, असा इशारा दिला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info