चीन व रशियाच्या आघाडीविरोधात अमेरिकेकडून ‘नाईन आईज् अलायन्स’चा प्रस्ताव

अमेरिकेकडून

वॉशिंग्टन – चीनच्या वर्चस्ववादी कारवाया रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचा गट असलेल्या ‘फाईव्ह आईज्’ची व्याप्ती वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेकडून सादर करण्यात येणार्‍या संरक्षणखर्चाच्या विधेयकात यासंदर्भातील शिफारस करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती बदलत आहे, याकडे लक्ष वेधून ‘फाईव्ह आईज्’मध्ये आणखी काही देशांचा समावेश करण्याची सूचनाही यात आहे. या देशांमध्ये भारत, जपान, दक्षिण कोरिया व जर्मनीचा समावेश आहे.

अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस आर्म्डड् सर्व्हिसेस कमिटी’ने पुढील वर्षाच्या संरक्षणखर्चाचा समावेश असणार्‍या ‘२०२२ नॅशनल डिफेन्स ऑथरायझेशन ऍक्ट’ला मान्यता दिली आहे. या विधेयकात विविध सूचना व शिफारशींचा समावेश आहे. त्यात ‘इंटेलिजन्स सबकमिटी’ने केलेल्या शिफारसी व सूचनाही समाविष्ट आहेत. ‘इंटेलिजन्स सबकमिटी’ने बदलत्या जागतिक परिस्थितीत ‘फाईव्ह आईज्’सारख्या गटांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

अमेरिकेकडून

चीन व रशियासारखे देश पुन्हा मोठा धोका म्हणून समोर येत असताना ‘फाईव्ह आईज्’ सदस्य देशांनी अधिक दृढपणे काम करण्याची गरज आहे. अशा गटाचा विस्तार करण्याची गरज असून त्यासाठी समविचारी लोकशाहीवादी देशांचे सहाय्य घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला सबकमिटीने दिला. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख संचालक व संरक्षणमंत्र्यांनी यासंदर्भात एक अहवाल पुढील वर्षापर्यंत सादर करावा, अशी सूचना ‘इंटेलिजन्स सबकमिटी’ने केली आहे.

या अहवालात ‘फाईव्ह आईज्’मधील सदस्य देशांबरोबर गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीसंदर्भात असलेले करार, गुप्तचर यंत्रणांची सध्याची स्थिती यांच्या माहितीचा समावेश असावा. तसेच ‘फाईव्ह आईज्’चा विस्तार करण्यासाठी जपान, दक्षिण कोरिया, भारत व जर्मनी यासारख्या देशांचे सहकार्य घेतल्यास, कोणत्या स्वरुपाचे लाभ मिळू शकतात, याचाही समावेश या अहवालात करण्यात यावा असे ‘इंटेलिजन्स सबकमिटी’ने सुचविले आहे.

अमेरिकेकडून

दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणांनी परस्परांमधील सहकार्य वाढविण्यासंदर्भात करार केला होता. त्यानंतर या आघाडीत कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचा समावेश करण्यात आला. अमेरिका व रशियामधील शीतयुद्धाच्या काळात ही आघाडी भक्कम करण्यासाठी पावले उचलण्यात आली होती. शीतयुद्ध संपल्यानंतरही ‘फाईव्ह आईज्’ कार्यरत असली तरी त्याच्या हालचालींची व्याप्ती खूपच मर्यादित होती.

गेल्या दशकभरात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या विस्तारवादी कारवायांची तीव्रता सातत्याने वाढत आहे. चीनच्या राजवटीने रशियाबरोबर आघाडी केली असून ही आघाडी नवा धोका म्हणून समोर येत आहे. हा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने याविरोधात पुढाकार घेतला आहे. यानुसार विविध सहकारी देशांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘फाईव्ह आईज्’चा विस्तारही त्याचाच भाग असून चार नव्या देशांच्या समावेशानंतर त्याचे रुपांतर ‘नाईन आईज्’मध्ये होण्याचे संकेत मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info