अमेरिकेचे ‘स्टारलिंक सॅटेलाईट्स’ क्षेपणास्त्राचा मार्ग बदलू शकतात – रशियन अंतराळसंस्थेच्या प्रमुखांचा इशारा

अमेरिकेचे ‘स्टारलिंक सॅटेलाईट्स’ क्षेपणास्त्राचा मार्ग बदलू शकतात – रशियन अंतराळसंस्थेच्या प्रमुखांचा इशारा

मॉस्को – अंतराळातून इंटरनेट पुरविण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आलेले अमेरिकेचे ‘स्टारलिंक’ उपग्रह क्रूझ क्षेपणास्त्रांचा मार्ग बदलू शकतात, असा इशारा रशियन अंतराळसंस्थेच्या प्रमुखांनी दिला. रशियाच्या ‘चॅनल वन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘रॉस्कॉस्मॉस’चे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी, सदर उपग्रहांचा वापर ‘स्पेशल फोर्सेस’ तसेच गुप्तहेरांना संदेश देण्यासाठीही केला जाऊ शकतो, असेही बजावले आहे. अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीची योजना असणार्‍या ‘स्टारलिंक’च्या माध्यमातून तब्बल ४२ हजार उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.

‘स्टारलिंक सॅटेलाईट्स’

उद्योजक एलॉन मस्क यांनी २०१४ साली उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट पुरविण्याची योजना मांडली होती. त्यानंतर गेल्या सात वर्षात ‘स्टारलिंक’च्या माध्यमातून सुमारे १८०० उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले असून त्यातील १६०० हून अधिक उपग्रह सक्रिय आहेत. या उपग्रहांच्या माध्यमातून सध्या जवळपास एक लाख ग्राहकांना इंटरनेटची सुविधा पुरविण्यात येते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे सर्व उपग्रह पृथ्वीभोवतालच्या ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये कार्यरत आहेत. या प्रकल्पाविरोधात काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अंतराळातील अपघात तसेच अंतराळातील कचर्‍याचे प्रमाण वाढेल, असे आरोप करण्यात येत आहेत.

मस्क यांच्या या प्रकल्पाला अमेरिकी सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान पुरविण्यात आले आहे. याकडे लक्ष वेधून रशियन अंतराळसंस्थेच्या प्रमुखांनी सदर प्रकल्पाच्या मागे वेगळेच उद्देश असल्याचा दावा केला. ‘अमेरिकेच्या सरकारने स्टारलिंक प्रकल्पासाठी स्पेसेक्स कंपनीला जवळपास ९० कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य पुरविले आहे. विविध माध्यमातून या प्रकल्पाला दिलेल्या अनुदानाची रक्कम २० अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे’, असे सांगून अमेरिकेच्या सरकारला अशा प्रकल्पाची काय आवश्यकता आहे? असा सवाल दिमित्रि रोगोझिन यांनी केला.

‘स्टारलिंक सॅटेलाईट्स’

‘स्टारलिंक योजनेतील उपग्रह फक्त इंटरनेटची सेवा पुरविणार नाही. तर याच्या माध्यमातून क्रूझ क्षेपणास्त्रे नियंत्रित करता येतील. क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्यानंतर त्यांचा मार्ग मध्येच बदलला जाऊ शकतो. स्पेशल फोर्सेस तसेच गुप्तहेरांच्या नेटवर्कला आदेश देण्यासाठीही स्टारलिंक उपग्रहांचा वापर होऊ शकतो’, असा आरोप रोगोझिन यांनी केला. या उपग्रहांच्या माध्यमातून रशियाविरोधी व राजकीय उद्देश असणार्‍या इंटरनेटची सुविधा पुरविली जाईल, असा आरोपही त्यांनी केला आहे. रशियाने उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट पुरविण्याची ‘स्फेरा’ नावाची स्वतंत्र योजना तयार केली असल्याचेही ‘रॉस्कॉस्मॉस’चे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान रशियातील संरक्षण अकादमीच्या अभ्यासकांनी देशाच्या किनारपट्टीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी नवी योजना सादर केली आहे. त्यानुसार, अमेरिकी युद्धनौकांनी रशियाच्या किनारपट्टीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास ड्रोन्स व लढाऊ विमानांच्या सहाय्याने त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. रशियाच्या ‘एअरफोर्स मिलिटरी एज्युकेशनल ऍण्ड सायंटिफिक सेंटर’च्या अभ्यासकांनी ही योजना तयार केल्याचे सांगण्यात येते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info