तालिबानला मान्यता न दिल्यास जगाच्या समस्यांमध्ये भर पडेल – तालिबानचा अमेरिकेला इशारा

काबुल – ‘तालिबानला मान्यता दिली नाही, तर अफगाणिस्तानसह या क्षेत्राच्या व जगाच्याही समस्यांमध्ये अधिकच भर पडेल’, अशी धमकी तालिबानने अमेरिकेला दिली. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने दिला. इटलीमध्ये सुरू असलेल्या जी२० बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर हा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी तालिबानने आपल्याला मान्यता न दिल्यास युरोपवर अफगाणी निर्वासित सोडून देऊ, असे युरोपसह अमेरिकेलाही धमकावले होते.

तालिबानला मान्यता

तालिबानने अफगाणिस्तानाचा ताबा घेऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. पण अजून कुठल्याही देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेने तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. मात्र अफगाणी जनतेसाठी अमेरिका, भारत, ब्रिटन, युरोपिय महासंघाने मानवतावादी सहाय्याची घोषणा केली आहे. पण तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्यासाठी अजूनही कुठला देश पुढे आलेला नाही. यामुळे अस्वस्थ झालेल्या तालिबानने अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांना धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे.

तालिबानचा मुख्य प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने शनिवारी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा तालिबानच्या राजवटीला मान्यता न देणार्‍या देशांना इशारा दिला. मुजाहिदने दोन दशकांपूर्वी अमेरिका आणि तालिबानमध्ये पेटलेल्या संघर्षाची आठवण करुन दिली. अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला आपल्या हवाली करण्याची मागणी अमेरिकेने तालिबानकडे केली होती. पण तालिबानने अमेरिकेची मागणी नाकारली. त्याआधीच्या काळातही अमेरिकेने तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचे नाकारले होते, याचा उल्लेख मुजाहिदने केला. त्यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना येत्या काळात पाश्‍चिमात्य देशांवर हल्ला चढवू शकतात, ते टाळायचे असेल तर अमेरिका व इतर देशांनी तालिबानच्या अफगाणिस्तानातील राजवटीला मान्यता द्यावी, असे मुजाहिद सुचवित आहे.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी तालिबानच्या या धमकीवर जोरदार ताशेरे ओढले. ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली तर आम्ही कमी क्रूरपणे वागू. पण जर मान्यता दिलीच नाही तर अत्यंत क्रौर्याचे प्रदर्शन करू. अधिक हत्याकांड घडवू, मानवाधिकारांचे उल्लंघन करू, असा संदेश तालिबान जगाला देत आहे. थोडक्यात तालिबान पाकिस्तानची नक्कल करीत आहे. कारण पाकिस्तान देखील पाश्‍चिमात्य देशांनी डॉलर्सचे पुरविले तर आम्ही कमी वाईट वागू, पण आम्हाला डॉलर्स नाकारले तर आमचे वर्तन अधिकच वाईट असेल, अशा धमक्या देत आहे’, असा खरमरीत टोला सालेह यांनी लगावला.

दरम्यान, तालिबानने दोहा करारातील अटी मान्य केल्याशिवाय मान्यता देणार नसल्याचे अमेरिका, भारत, ब्रिटन, युरोपिय महासंघ या प्रमुख देशांनी ठणकावले आहे. तर रशिया व इराण या देशांनी देखील तालिबानला मान्यता देण्याची ही योग्य वेळ नसल्याचे म्हटले आहे. तालिबानबरोबर सहकार्य ठेवून असलेल्या पाकिस्तान व चीनने देखील तालिबानच्या राजवटीला उघडपणे मान्यता दिलेली नाही. इतर देशांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाकिस्तान व चीन करीत आहे. पण सर्वात आधी हा निर्णय घेण्याचे धाडस पाकिस्तान व चीन देखील दाखवू शकलेले नाहीत. अशा परिस्थितीत अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांना धमक्या देऊन तालिबानने आपल्यासमोरील अडचणी अधिकच वाढविल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info