चीनची अर्थव्यवस्था मंदावत असल्याची पंतप्रधान ली केकिआंग यांची कबुली

बीजिंग – चीनची अर्थव्यवस्था मंदावत असल्याची कबुली पंतप्रधान ली केकिआंग यांनी दिली. गेल्या काही महिन्यात चीनच्या अर्थव्यवस्थेला सातत्याने धक्के बसत असून विकासदरात सातत्याने घसरण होत आहे. अनेक वित्तसंस्थांनी चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीकडे लक्ष वेधले असून धक्क्यांची तीव्रता वाढेल, असे भाकित वर्तविले आहे. अर्थव्यवस्थेला बसणार्‍या फटक्यांच्या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी होणार्‍या कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनात शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाला आव्हान मिळू शकते, असा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे.

ली केकिआंग

चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने गेल्या वर्षी खाजगी क्षेत्रातील बड्या कंपन्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यापाठोपाठ कर्जाच्या ओझ्यामुळे चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांना धक्के बसण्यास सुरुवात झाली. याच सुमारास चीनमधील वीजेची मागणी वाढल्याने ऊर्जा संकट तीव्र झाले. त्यात कोरोनाचे उद्रेक रोखण्यासाठी लादण्यात येणार्‍या निर्बंधांचीही भर पडली आहे. या सर्वांचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली असून आर्थिक विकासदरात घसरण झाली आहे. चीनचे अधिकारी व यंत्रणा घसरणीची थेट कबुली न देता आर्थिक सुधारणांमुळे बदल होत असल्याचे दावे करीत होते.

ली केकिआंग

या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान ली केकिआंग यांनी अर्थव्यवस्था मंदावत असल्याची कबुली देणे महत्त्वाचे ठरते. पंतप्रधान केकिआंग यांनी मंदीमागची कारणे स्पष्ट केली नसली तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी काही उपाययोजनांचे संकेत दिले आहेत. त्यात छोट्या व मध्यम उद्योगांना करसवलत तसेच विविध शुल्कांमध्ये कपात करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. त्याचवेळी अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालिन कामगिरीचा विचार करून चलन व पतधोरणात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही पंतप्रधान केकिआंग यांनी बजावले.

केकिआंग यांच्या कबुलीचे पडसाद चीनच्या शेअरबाजारात उमटले आहेत. चीनमधील शांघाय, शेन्झेन, सीएसआय३०० या सर्व शेअर निर्देशांकांमध्ये घसरण झाली. हॉंगकॉंगमधील हँगसेंग इंडेक्सही एक टक्क्याने खाली आला. गेले काही आठवडे खाजगी कंपन्यांविरोधातील कारवाई व रिअल इस्टेट क्षेत्रातील घडामोडींनी शेअरबाजाराला धक्के बसत होते. त्यात आता पंतप्रधान केकिआंग यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचा केलेला उल्लेख चीनमधील गुंतवणुकदारांमध्ये असलेली असलेली भीती व असुरक्षितता अधिक वाढविणारा ठरल्याचे विश्‍लेषकांनी म्हटले आहे.

ली केकिआंग

चीनच्या अर्थव्यवस्थेतील घसरणीचे परिणाम सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीवरही दिसून येत असल्याचा दावा ‘जेम्सटाऊन फाऊंडेशन’ या अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे. पुढील वर्षी कम्युनिस्ट पार्टीचे अधिवेशन होणार असून त्यात पक्षाच्या व देशाच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या वर्षापर्यंत ही दोन्ही पदे जिनपिंग यांच्याकडेच राहतील व ते अखेरपर्यंत सदर पदे भूषवितील, असे मानले जात होते.

मात्र अर्थव्यवस्थेला बसणार्‍या धक्क्यांच्या पार्श्‍वभूमीवर, चीनच्या अंतर्गत राजकीय व्यवस्थेला धक्के बसू लागले आहेत. कम्युनिस्ट पार्टीतील एक गट जिनपिंग यांच्यावर नाराज असल्याचे समोर येत आहे. यात माजी राष्ट्राध्यक्ष जिआंग झेमिन यांचे निकटवर्तिय असणारे झेंग किंगहॉंग व उपराष्ट्राध्यक्ष वँग किशॅन यांचा समावेश असल्याचा दावा अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे. जिनपिंग यांच्या या विरोधकांनी पक्ष तसेच सुरक्षायंत्रणेच्या सहाय्याने जिनपिंग यांच्याविरोधात कारवाया सुरू केल्याचे अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे. गेल्या दशकात जिनपिंग यांनी पक्षावर मिळवलेली पकड थोडी ढिली पडली असून त्यांचे विश्‍वासू सहकारी असणारे विरोधी गटात गेल्याचा दावाही ‘जेम्सटाऊन फाऊंडेशन’ने केला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info