पुढील साथ कोरोनापेक्षा अधिक घातक व भयावह असेल

- ब्रिटीश संशोधक सारा गिल्बर्ट यांचा इशारा

घातक

लंडन – ‘सध्या आलेली कोरोनाची साथ ही काही एखाद्या आजाराने जगात उलथापालथ घडविण्याची अखेरची वेळ नाही. पुढील साथ याहून अधिक भयावह असू शकते. कोरोनानंतर येणार्‍या साथीचा विषाणू अधिक संसर्गजन्य व घातक असू शकतो’, असा गंभीर इशारा ब्रिटनमधील आघाडीच्या संशोधन सारा गिल्बर्ट यांनी दिला. इटलीतील संशोधकांनीही येत्या काही दशकात मानवजातीला कोरोनाप्रमाणेच मोठ्या साथीला तोंड द्यावे लागेल, असे बजावले आहे. तर अमेरिकेतील आरोग्ययंत्रणेचे प्रमुख फ्रान्सिस कॉलिन्स यांनी, ‘ओमिक्रॉन’ हा काही कोरोनाचा अखेरचा व्हेरिअंट नसून कोरोनाच्या विषाणूत अजूनही मोठे बदल होऊ शकतात, असे बजावले आहे.

गेल्या महिन्यात आफ्रिका खंडातून समोर आलेल्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’ने जगभरात खळबळ उडवली आहे. या नव्या व्हेरिअंटचा संसर्गाचा वेग आधीच्या व्हेरिअंटपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश तज्ज्ञांनी लसीकरण, मास्कचा वापर व आरोग्यविषयक नियमांचे पालन यावर भर देणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी काही तज्ज्ञ नव्या साथीच्या शक्यतेकडेही लक्ष वेधत आहेत.

घातक

ब्रिटीश संशोधक सारा गिल्बर्ट यांनी कोरोनावरील लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. गिल्बर्ट यांनी नव्या साथीचा इशारा देतानाच त्याला रोखण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू व्हायला हवेत, याची जाणीव करून दिली. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान पाहता संशोधन तसेच साथींना रोखण्याची तयारी यासारख्या क्षेत्रांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे ब्रिटीश संशोधिकेने म्हटले आहे. कोरोनाच्या साथीचा मुकाबला करताना मिळालेली माहिती व इतर गोष्टींचा वापर पुढील साथीविरोधात होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी ओमिक्रॉनबाबत भीती बाळगण्याची गरज नसली तरी सावधानता हवी, असा सल्लाही गिल्बर्ट यांनी दिला.

घातक

गिल्बर्ट यांच्यापाठोपाठ इटलीतील संशोधकांनीही नव्या साथीबाबत दावा केला आहे. इटलीच्या पॅडोव्हा युनिव्हर्सिटीतील अभ्यासक मार्को मॅरानी यांनी येत्या काही दशकात नवी साथ येण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या चार शतकांमध्ये जगात आलेल्या विविध साथींचा अभ्यास करून मॅरोनी यांनी हा दावा केला आहे. पुढच्या पिढीला कोरोनाप्रमाणेच मोठ्या साथीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता ३८ टक्के असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ’चे संचालक फ्रान्सिस कॉलिन्स यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटबाबत बजावले आहे. ओमिक्रॉन हा काही कोरोनाचा अखेरचा व्हेरिअंट नसून कोरोनाच्या विषाणूत अजूनही बदल घडून नवे व्हेरिअंट समोर येतील, याकडे कॉलिन्स यांनी लक्ष वेधले. गेल्या महिन्यात आफ्रिकेतून समोर आलेल्या ओमिक्रॉनच्या व्हेरिअंटची साथ जगभरातील सुमारे ४० देशांमध्ये पसरली असून त्याची पूर्ण व्याप्ती अद्याप समोर आली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info