चीनची ‘एव्हरग्रॅन्ड’ व ‘कैसा’ कर्जाची परतफेड करण्यात अपयशी

- पतमानांकन संस्थेकडून ‘डिफॉल्टर’चा शिक्का

बीजिंग – चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणारी ‘एव्हरग्रॅन्ड’ व ‘कैसा’ या कंपन्या परदेशातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे ‘फिच’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने दोन्ही कंपन्या ‘डिफॉल्टर’ अर्थात कर्जबुडव्या झाल्याचे जाहीर केले आहे. ‘एव्हरग्रॅन्ड’ एक अब्ज डॉलर्सहून अधिक कर्जाची देणी चुकवू शकलेली नाही. तर ‘कैसा’ ने ४० कोटी डॉलर्स कर्जाची परतफेड केली नसल्याचे उघड झाले आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने चीनमधील रिअल इस्टेट क्षेत्राच्या संकटामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढू शकतो व त्याचा फटका अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला बसेल, असे बजावले होते.

‘कैसा’

गेल्या वर्षभरात चीनच्या मालमत्ता व बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणारी ‘एव्हरग्रॅन्ड’चे समभाग ८० टक्क्यांहून अधिक कोसळले होते. या कंपनीवर तब्बल ३०५ अब्ज डॉलर्सची कर्जे असून ती फेडण्यास कंपनी सक्षम नसल्याचे दावे करण्यात येत होते. कंपनीने काही कर्जांच्या परतफेडीची मुदत वाढवून घेतली होती.तसेच कर्जाचा काही भाग फेडण्यात यश मिळविले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच कंपनीने एक निवेदन देत यापुढील कर्ज व हफ्ते फेडण्याची क्षमता नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे कंपनी ‘डिफॉल्टर’च्या यादीत जाण्याची शक्यता वाढली होती.

गुरुवारी ‘फिच रेटिंग्ज्’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने ‘एव्हरग्रॅन्ड’ बुडित कर्जदार झाल्याचे जाहीर केले. एव्हरग्रॅन्डने सुमारे १.२ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड केली नसल्याचे फिचकडून सांगण्यात आले. एव्हरग्रॅन्डसह दोन उपकंपन्यांना ‘रिस्ट्रिक्टेड डिफॉल्टर’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘कैसा होल्डिंग ग्रुप’ या कंपनीवरही बुडित कर्जदार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कंपनीने ४० कोटी डॉलर्सचे कर्ज चुकविलेले नाही.

‘कैसा’

फिचच्या घोषणेनंतर गेल्या सहा महिन्यात चीनमध्ये कर्जबुडव्या ठरलेल्या रिअल इस्टेट कंपन्यांची संख्या १०वर गेली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत रिअल इस्टेट व संबंधित क्षेत्राचा वाटा जवळपास ३० टक्के आहे. चीनच्या बँकांनी दिलेल्या कर्जांमध्ये सर्वाधिक बुडीत कर्जेही याच क्षेत्रातील असल्याचे समोर आले आहे. २०२१ साली चीनच्या कंपन्यांनी बुडविलेल्या कर्ज व व्याजाची आकडेवारी सुमारे १० अब्ज डॉलर्सवर गेली असून त्यातील ३६ टक्के रक्कम रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांची आहे.

चीनच्या मध्यवर्ती बँकेने दिलेल्या निवेदनात, कर्ज देणार्‍यांचे तसेच समभागधारकांचे हितसंबंध सुरक्षित राखले जातील, असे म्हटले आहे. त्याचवेळी एव्हरग्रॅन्डचे भवितव्य बाजारपेठेच्या नियमांनुसार ठरेल, असेही स्पष्ट केले. ‘एव्हरग्रॅन्ड’ व ‘कैसा’ डिफॉल्टर ठरण्याचे मोठे पडसाद चीन तसेच हॉंगकॉंगमध्ये उमटणार नसल्याचे दावे स्थानिक विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे. त्यामागे चीनच्या मध्यवर्ती बँकेने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेले सुमारे १९० अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः अमेरिका व युरोपातील गुंतवणुकदारांमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info