अमेरिका व युरोपमधील कोरोनाच्या संसर्गात भयावह वाढ

कोरोनाच्या संसर्गात

वॉशिंग्टन/बु्रसेल्स – अमेरिका व युरोपिय देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गात पुन्हा एकदा भयावहरित्या वाढ होत असल्याचे दिसू लागले आहे. अमेरिकेच्या आघाडीच्या आरोग्यतज्ज्ञांनी दर दिवशी आढळणार्‍या रुग्णांची संख्या १० लाखांपर्यंत जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे दगावलेल्यांची संख्या १२ झाली आहे. तर फ्रान्समध्ये २४ तासांमध्ये सुमारे ६० हजार नवे रुग्ण आढळले असून ओमिक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या ३०० वर जाऊन पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांच्या संख्येत दर तीन दिवसांनी १०० टक्क्यांहून अधिक भर पडत असल्याचे बजावले आहे.

कोरोनाच्या संसर्गात

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकेत कोरोना रुग्ण व दगावणार्‍यांच्या संख्येत ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. दर आठवड्याला आढळणार्‍या रुग्णांची सरासरी संख्या सव्वा लाखांवर गेली आहे. यात डेल्टा व ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरिअंटच्या वाढत्या रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची आकडेवारीही दोन हजारांनजिक पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘नॅशनल इन्स्टिट्यूटस् ऑफ हेल्थ’चे प्रमुख फ्रान्सिस कॉलिन्स यांनी तीव्र चिंता व्यक्त करणारा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या संसर्गात

‘मला माहिती आहे की जनता कोरोनाला कंटाळली आहे, मीदेखील त्यापैकीच एक आहे. पण हा विषाणू आपल्याला कंटाळलेला नाही. दर दोन महिन्यांनी आपला आकार बदलून तो समोर येत आहे. नवे अधिक फैलाव करणारे व्हेरिअंट उघड होत आहेत. आता हिंमत हरून चालणार नाही. साथ रोखण्याच्या उपायांमध्ये शिथिलता आली, तर धोका कमी असला तरीही अमेरिकेत दर दिवशी १० लाख रुग्ण आढळू शकतात’, असा इशारा फ्रान्सिस कॉलिन्स यांनी दिला. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या पाच कोटी, सात लाखांहून अधिक असून आठ लाख, सहा हजारांहून अधिक जण दगावले आहेत.

अमेरिकेबरोबरच ब्रिटनसह इतर युरोपिय देशांमध्येही कोरोनाची तीव्रता वाढते आहे. ब्रिटनमध्ये २४ तासांमध्ये ८२ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल ६४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे ब्रिटनमध्ये आतापर्यंत १२ जण दगावल्याची माहितीही देण्यात आली आहे. तर ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३७ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे आपत्तीसदृश स्थितीची (मेजर इन्सिडंट) घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संसर्गात

युरोपमधील आघाडीच्या देशांमध्येही कोरोनाची तीव्रता वाढू लागली असून फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, स्पेन, इटली, नेदरलॅण्ड्स यासारख्या देशांमध्ये नव्या निर्बंधांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये २४ तासात सुमारे ६० हजार रुग्ण आढळले असून जर्मनीतील संख्या ३० हजारांनजिक पोहोचली आहे. स्पेनमध्ये एका दिवसात ३३ हजारांहून अधिक रुग्णांना संसर्ग झाला असून बेल्जियम व स्वित्झर्लंडमध्ये सुमारे १० हजार रुग्णांची नोंद झाली आहे. रशियात २४ तासांमध्ये २८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून लस न घेणारे नागरिक ‘धोकादायक मूर्ख’ असल्याचा दावा रशियन प्रवक्त्यांनी केला आहे.

दरम्यान ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे इस्रायलमध्ये कोरोनाची पाचवी लाट आली असून सरकारने परदेश प्रवासावर मोठे निर्बंध लादत असल्याचे जाहीर केले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info