रशियाने युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविली

किव्ह – युक्रेनची राजधानी ताब्यात घेऊन इथे क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात करण्यासाठी रशियाने जबरदस्त लष्करी कारवाई सुरू ठेवली आहे. हा संघर्ष सुरू असतानाच, रशियाने युक्रेनबरोबर चर्चेची तयारी दाखविली. मात्र त्याआधी युक्रेनच्या लष्कराला शस्त्रे खाली ठेवावी लागतील, असे रशियाने बजावले आहे. युक्रेन त्यासाठी तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. रशियाच्या ताब्यातून राजधानी किव्हची सुटका करण्यासाठी युक्रेनच्या लष्करी पथकांनी प्रवास सुरू केल्याचा दावा या देशाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची नक्की किती हानी झाली, याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळी माहिती येत आहे. रशियाचे हजाराहून अधिक सैनिक युक्रेनी लष्कराने ठार केल्याचे दावे युक्रेनचे संरक्षण मंत्रालय करीत आहे. तसेच काही रशियन सैनिकांना आपल्या लष्कारने ताब्यात घेतल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. रशियाच्या सीमेवरून युक्रेनमध्ये दाखल होत असलेले अतिरिक्त सैन्य युक्रेनच्या लष्कराने पिटाळून लावल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.

हल्ल्यांची तीव्रता

युक्रेनकडून असे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात रशियन हवाई दल आणि लष्कराच्या हल्ल्यासमोर टिकाव धरणे युक्रेनच्या लष्करासाठी अधिकाधिक अवघड बनत चालले आहे. राजधानी किव्हच्या बर्‍याचशा भागाचा ताबा रशियन लष्कराकडे आहे. इतकेच नाही तर रशियन लष्कर आता राजधानी किव्हमध्ये हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. रशियन लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांच्या मार्‍यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना बंकरमध्ये सुरक्षित ठेवण्याचा निर्णय युक्रेनी लष्कराला घ्यावा लागला. अशा परिस्थितीत रशियाकडून राजधानी किव्हचा ताबा घेण्याचे युक्रेनी लष्कराचे दावे सध्या तरी अवास्तव ठरतात. रशियन लष्कराने युक्रेनच्या नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केल्याचे आरोप झाले आहेत.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेले नाही. तर युक्रेनचा तटस्थपणा संपविण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारपासून या देशाला वाचविण्यासाठी रशिया लष्करी कारवाई करीत आहे’, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्पष्ट केले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपण रशियाबरोबर चचेसाठी तयार असल्याचे जाहीर केले होते. हा प्रस्ताव रशियाने स्वीकारला आहे.

यानुसार बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे उच्चस्तरिय शिष्टमंडळ पाठविण्याची तयारी रशियाने केली आहे. मात्र सदर चर्चेच्या आधी युक्रेनच्या लष्कराने शस्त्रे खाली ठेवावी, अशी मागणी रशियाने केली. सध्या तरी युक्रेन याला तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत. उलट रशियन लष्कराला आपण टक्कर देत असल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे दावे परिस्थिती अधिकच चिघळविणारे ठरतात. रशियन आक्रमणासमोर युक्रेनची दैना उडालले असताना देखील, अमेरिका तसेच नाटोने युक्रेनसाठी रशियाबरोबर युद्ध छेडता येणार नाही, असे अप्रत्यक्षपणे मान्य केले. रशियावर दिर्घकाळ परिणाम करणारे कठोर आर्थिक निर्बंध लादून रशियाला कमकुवत करण्याची तयारी आपण केल्याचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. याने पुढच्या काळात रशिया कमकुवत झाला तरी त्याने सध्या युक्रेनसमोर खड्या ठाकलेल्या भयंकर संकटाचे निवारण होणार नाही, हे स्पष्टपणे दिसते आहे.

दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून युक्रेनच्या प्रश्‍नावर चर्चा केली. चीन रशियाच्या मागे ठामपणे उभा असल्याची ग्वाही यावेळी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्याचे वृत्त आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info