युक्रेनची बंदरे व प्रमुख शहरांवर रशियाचे घणाघाती हल्ले

किव्ह – राजधानी किव्हसह युक्रेनच्या दहा प्रमुख शहरांवर रशियाने घणाघाती हवाई हल्ले सुरू ठेवले आहेत. युक्रेनच्या दक्षिणेकडे असलेल्या खेरसन बंदराचा रशियाने ताबा घेतला असून मारिपोल बंदर देखील काही तासात रशियाच्या नियंत्रणाखाली असेल. या दोन्ही बंदरांचा ताबा घेऊन रशिया युक्रेनची संपूर्णपणे कोंडी करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिका व नाटोने युक्रेनला शस्त्रसज्ज करण्याची घोषणा करून रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहे खरे. पण युक्रेनवरून अणुयुद्ध पेटेल, असा इशारा देऊन रशियाने अमेरिका व नाटोला याच्या भयंकर परिणामांची जाणीव करून दिलेली आहे.

घणाघाती हल्ले

युक्रेनमधील युद्धात आपले ४९८ जवान ठार झाल्याची कबुली रशियाने दिली. त्याचवेळी या संघर्षात युक्रेनी लष्कराचे २८०० हून अधिक जवान मारले गेले असून साडेतीन हजाराहून अधिक जवान जखमी झाल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. तसेच रशियाने युक्रेनच्या ५७२ जवानांना ताब्यात घेतल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनच्या राजधानीसह दहा प्रमुख शहरांवर रशियन हवाई दलाची विमाने जबरदस्त बॉम्बफेक करीत असून यामुळे इमारती बेचिराख बनल्याचे फोटोग्राफ्स माध्यमे व सोशल मीडियावरही प्रसिद्ध होत आहेत.

या हल्ल्यांमध्ये निष्पाप युक्रेनी नागरिकांचा बळी जात असल्याचा आरडाओरडा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत असून त्याचा रशियाविरोधी प्रचारासाठी वापर केला जात आहे. अमेरिका व युरोपिय देश देखील या हल्ल्यांचा वापर करून रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय जनमत भडकवत आहेत. मात्र रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत लॅव्हरोव्ह यांनी पाश्‍चिमात्यांचे हे आरोप धुडकावले आहेत.

पाश्‍चिमात्य देश सातत्याने युक्रेनला शस्त्रसज्ज करीत असल्याचे तसेच युक्रेनी लष्कराला प्रशिक्षण देऊन या देशात तळ विकसित करीत असल्याचे आरोप केले. या तळांद्वारे रशियाच्या विरोधात मुसंडी मारण्यासाठी युक्रेनचा वापर करण्याचा पाश्‍चिमात्यांचा डाव होता. पण रशियाच्या विरोधात वापरण्याचा कट असलेल्या लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्याखेरीज आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी ठासून सांगितले. याच्या आधी लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनच्या प्रश्‍नावर तिसर्‍या महायुद्धाचा भडका उडेल आणि तिसर्‍या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर होईल, असा थरकाप उडविणारा इशारा दिला होता.

या इशार्‍याकडे दुर्लक्ष करणे अमेरिका व नाटोला अवघड बनले आहे. अणुयुद्धाचा धोका वाढल्याने युक्रेनबाबत अमेरिका-नाटोने स्वीकारलेल्या भूमिकेपासून निदान काही देश तरी नक्कीच फारकत घेऊ शकतील. सध्या रशियाच्या विरोधात असलेले आंतरराष्ट्रीय जनमत देखील युक्रेनमधील युद्ध थांबविण्यासाठी तडजोड करण्याचा आग्रह धरतील अशी चिंता अमेरिका व नाटोला वाटू लागली आहे. म्हणूनच या प्रश्‍नावर रशियाला अधिक जहाल धमक्या देण्याच्या ऐवजी, आण्विक धमक्या देण्याची गरज नसल्याचे अमेरिका व नाटोचे अधिकारी सांगू लागले आहेत.

English    हिंदी    

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info