थेट लष्करी हस्तक्षेप करून अमेरिका युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध पेटविणार नाही

- पण नाटोच्या भूमीचे रक्षण करण्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे आश्‍वासन

वॉशिंग्टन/किव्ह – रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हचा ताबा घेण्यासाठी जबरदस्त हल्ले चढवित आहे. युक्रेनचे लष्कर हे हल्ले थोपविण्याचे प्रयत्न करीत आहे खरे. पण हा प्रतिकार आणखी किती काळ टिकेल, असा प्रश्‍न युक्रेनची बाजू उचलून धरणारी आंतरराष्ट्रीय माध्यमेही विचारू लागली आहेत. अशा परिस्थितीत रशियाच्या शेजारी देशांमध्ये अमेरिकेचे सुमारे १२ हजार जवान तैनात असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. पण युक्रेनमध्ये हे सैन्य घुसवून अमेरिका ‘तिसरे महायुद्ध’ सुरू करणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केले.

तिसरे महायुद्ध

राजधानी किव्हपासून रशियाचे सैन्य अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे युक्रेनचे जवान रशियाला रोखण्यासाठी जोरदार लढत देत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याची माहिती देऊन आपल्या लष्कराच्या शौर्याचे कौतूक केले. युक्रेनचे लष्कर रशियाच्या आक्रमणाला आणखी किती काळ प्रतिकार करू शकेल, असा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारला जात आहे. किव्ह ताब्यात घेण्यासाठी रशियाने एकाच वेळी अनेक आघाड्यांवरून हल्ले चढविले आहेत. त्याचवेळी युक्रेनच्या इतर भागांवरही रशियाचे जबरदस्त हवाई हल्ले सुरू आहेत.

रशियन लढाऊ विमाने युक्रेनच्या उद्योगक्षेत्र तसेच पायाभूत सुविधांना लक्ष्य करीत आहे. युके्रनचे लष्कर व या लष्कराशी संलग्न असलेल्या सशस्त्र गटांवरही रशियन सैन्याने हल्ले तीव्र केले आहेत. रशियाच्या विरोधात दुसर्‍या प्रबळ देशाने थेट लष्करी हस्तक्षेप केला नाही, तर युक्रेनचा प्रतिकार लवकरच संपुष्टात येईल, असे दावे माध्यमांकडून केले जातात. यामुळेच युक्रेनमधून लाखोजण इतर देशांमध्ये धाव घेत आहेत. अशा दारूण परिस्थितीतही अमेरिका युक्रेनमध्ये आपले लष्कर पाठवायला तयार नाही. युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये अमेरिकेने सुमारे १२ हजार जवान तैनात केलेले आहेत. यामध्ये लाटविया, इस्तोनिया, लिथुअनिया, रोमानिया या देशांचा समावेश आहे, याची आठवण बायडेन यांनी करून दिली.

तिसरे महायुद्ध

मात्र युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिका उतरली तर तिसरे महायुद्ध पेट घेईल, अमेरिकेला युक्रेनच्या युद्धात उडी घेऊन तिसरे महायुद्ध पेटवायचे नाही, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले. मात्र युक्रेनला अमेरिकेचे संपूर्ण सहाय्य मिळेल, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन पुढे म्हणाले. त्याचवेळी नाटोच्या सदस्यदेशांवर हल्ला झाला तर मात्र अमेरिका नाटो देशांच्या प्रत्येक इंच भूमीचे रक्षण करील, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन पुढे म्हणाले.

युक्रेनच्या युद्धात उतरणार नाही, पण युक्रेनला सहाय्य करू आणि नाटो देशांच्या भूमीचे रक्षण करू, हा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा संदेश अमेरिकेची अस्पष्ट भूमिका दाखविणारा आहे की ती रशियाच्या विरोधातील व्यूहरचना आहे, हे अजूनही समोर आलेले नाही. युक्रेनला पुरेशा प्रमाणात अमेरिका सहाय्य करीत नसल्याची टीका खुद्द अमेरिकेतूनच होत आहे. पण थेट युद्धाचे परिणाम टाळून अप्रत्यक्ष युद्ध खेळणे किफायतशीर ठरेल, असा संदेश बायडेन देत आहेत. त्याचवेळी युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये सैनिक तयार ठेवून व त्याद्वारे युक्रेनला मदत करून अमेरिका रशियाला या देशांवर लष्करी कारवाई करण्यास भाग पाडत असल्याचे दिसते. युक्रेनच्या शेजारी असलेल्या नाटो सदस्यदेशांना रशियो लक्ष्य केले, तर या युद्धाचा भडका उडविणे अमेरिकेला सहज शक्य होईल. तशा परिस्थितीत याचे खापर रशियावर फोडणे अमेरिकेसाठी सोयीस्कर ठरू शकते.

या डावपेचांची रशियाला कल्पना असून युक्रेनच्या शेजारी देशांनी अमेरिकेच्या या कटात सहभागी न होण्याचा इशारा रशिया सातत्याने देत आहे. त्याची गंभीर दखल काही देशांनी घेतली असून अमेरिकेच्या सूचनेनुसार युक्रेनला थेट सहाय्य पुरविण्याचे नाकारले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info