युक्रेनच्या युद्धावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा चीनला इशारा

- रशियाला सहाय्य केल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली

वॉशिंग्टन/बीजिंग – युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाला चीनने सहाय्य पुरविले, तर त्याचे भयंकर परिणाम संभवतील, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला बजावले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबरील व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हा इशारा दिल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. तर अमेरिका आणि नाटोने रशियाशी थेट चर्चा करून युक्रेनचे युद्ध थांबवावे, अशी अपेक्षा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केल्याची चिनी माध्यमांनी म्हटले आहे.

युक्रेनचे युद्ध पेटलेले असताना, चीनला रशियापासून वेगळे काढता येऊ शकेल, असा दावा अमेरिकेच्या ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला होता. तर अमेरिकेचे नेते व माध्यमे युक्रेनमधील युद्धात चीन रशियाच्या बाजूने उभा असल्याचे दावे करून यावर तीव्र चिंता व्यक्त करीत होते. चीनच्या या रशियाधार्जिण्या भूमिकेमुळे अमेरिका व चीनच्या संबंधांवर परिणाम होईल, असा इशारा अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी दिला होता. हा संदेश चीनपर्यंत पोहोचविण्याची उत्तम संधी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेत मिळेल, असा विश्‍वास व्हाईट हाऊसने व्यक्त केला होता.

युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाला याची फार मोठी किंमत चुकती करण्यास अमेरिका भाग पाडल्यावाचून राहणार नाही. या युद्धात रशियाला सहकार्य केले, तर त्याचे भयंकर परिणाम चीनलाही सहन करावे लागतील, याची जाणीव राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना करून दिली, असे दावे अमेरिकेकडून केले जात आहेत. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेनंतर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या यासंदर्भातील निवेदनावर चीनची माध्यमे टीका करीत आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी चीनला धमकावल्याचे चित्र अमेरिका जगाला दाखवू पाहत आहे. पण याने युक्रेनची समस्या सुटणार नाही, असा दावा चीनचे विश्‍लेषक करीत आहेत. उलट चीनने यासंदर्भात स्वीकारलेली भूमिका अधिक प्रगल्भ असल्याचा दावा या विश्‍लेषकांनी केला आहे.

युक्रेनची समस्या सोडवायची असेल, तर अमेरिका-नाटोने थेट रशियाशी चर्चा करावी, असा सल्ला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिला. इतकेच नाही तर अमेरिका व चीनसारख्या प्रमुख देशांनी जगभरातील संवेदनशील प्रश्‍न हाताळण्यासाठी विचारविनिमय करायला हवा, असे चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या चर्चेत सुचविल्याचे सांगितले जाते. याद्वारे चीन अमेरिकेबरोबरील चर्चेची प्रक्रिया सुरू करून आपले महत्त्व अधिकच वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर येत आहे.

अमेरिका व चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेतून एकमेकांना इशारे देऊन परस्परांची समजूत काढण्याच्या पलिकडे काही विशेष झालेले नसल्याचे दिसत आहे. बायडेन प्रशासन चीनबाबत नरमाईची भूमिका स्वीकारणारे असल्याचे आरोप होत आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याबरोबरील चर्चेचा वापर राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांच्या प्रशासनाकडून केला जात आहे. त्याचबरोबर चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील ही चर्चा करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियावरील दडपण वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info