युक्रेनवरील लष्करी कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण

- रशियाचा दावा

मॉस्को/किव्ह – युक्रेनवरील लष्करी कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा रशियाने केली. ही घोषणा करीत असतानाच, रशियन हेलिकॉप्टर्सनी युक्रेनवर अधिक भीषण हल्ले चढविले आहेत. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पोलंडचा दौरा केल्यानंतर, पोलंडच्या सीमेजवळील युक्रेनच्या लिव्ह शहरावर रशियाने जबरदस्त हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत. याद्वारे रशियाच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारणार्‍या पोलंडला रशियाने सज्जड इशारे दिल्याचा दावा केला जातो.

युक्रेनमधील युद्धाला महिना पूर्ण होत असताना रशियाने या लष्करी कारवाईचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्याची घोषणा केली. यामध्ये रशियाने १,३५१ सैनिक गमावले असून ३,८२५ सैनिक यात जखमी झाले आहे. पण युक्रेनच्या ताब्यात असलेल्या लुहान्स प्रांताचा ९३ टक्के इतका भाग रशियासमर्थक गटांनी स्वतंत्र केला, अशी माहिती रशियाने दिली. याबाबत युक्रेन करीत असलेले दावे पूर्णपणे वेगळे आहेत. मात्र युक्रेनचे युद्ध संपविण्यासाठी रशिया हे युद्ध अधिकच तीव्र करीत असल्याचा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिला आहे.

पुढच्या काळात रशिया युक्रेनवर अधिक जोरदार कारवाई करील, अशी चिंता अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देश व्यक्त करीत आहेत. रशिया टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स अर्थात अण्वस्त्रांचा वापर करील, असा देखील अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केल्याचे सांगितले जाते. तर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह यांनी कुणालाही युद्ध नको असले तरी अणुयुद्धाचा धोका कायम आहे, अशा सूचक शब्दात अमेरिका-नाटोला इशारा दिला. याआधी रशियाच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्यास अणुयुद्ध छेडण्यास कचरणार नाही, असे रशियाचे प्रवक्ते पेस्कोव्ह यांनी बजावले होते.

दरम्यान, रशिया युक्रेनमध्ये रासायनिक हल्ले चढवू शकेल, अशी चिंता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे झाल्यास अमेरिका युक्रेनमधील युद्धात उतरेल, अशी धमकीही बायडेन यांनी दिली. तर पोलंडमध्ये तैनात असलेल्या अमेरिकी जवानांना संबोधित करताना बायडेन यांनी आपण लवकरच युक्रेनमध्ये जाणार असल्याचा संदेश दिला होता. त्यानंतर अमेरिका युक्रेनमधील युद्धात सहभागी होणार असल्याचे दावे प्रसिद्ध झाले. मात्र व्हाईट हाऊसने यावर खुलासा दिला असून राष्ट्राध्यक्षांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले आहे. अमेरिका युक्रेनच्या युद्धात सहभागी होणार नाही, असे व्हाईट हाऊसने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info