चर्चा अपयशी ठरल्यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ल्यांची धार वाढविली

मॉस्को/किव्ह – रशिया व युक्रेनमधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर, रशियाने युक्रेनवरील हल्ल्यांची धार अधिकच वाढविली आहे. राजधानी किव्ह तसेच उत्तरेकडील चेर्निव्ह आणि निझिन शहरांवर रशियन लष्कराने जबरदस्त हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत. राजधानी किव्हचे उपनगर असलेल्या इरपिनमध्ये रशियाच्या हल्ल्यात ३०० नागरिक व ५० जवान ठार झाल्याची माहिती युक्रेनने दिली. त्याचवेळी किव्ह तसेच इतर शहरांजवळून रशियन लष्कर माघार घेत असल्याचे दावे निकालात निघाले असून इथे रशियन लष्कर अधिकच आक्रमक बनल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

हल्ल्यांची धार

रशियाच्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये पार पडलेल्या रशिया व युक्रेनमधील चर्चा अपयशी ठरल्याचे जाहीर केले. या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी समोर आहेत. तरीही युक्रेनला युद्धबंदीसाठी अजूनही बरेच काही करावे लागेल, असे पेस्कोव्ह यांनी बजावले आहे. २०१४ साली रशियाने युक्रेनच्या क्रिमिआचा ताबा घेऊन हा भूभाग आपल्या देशाला जोडला होता. त्यावर युक्रेनला चर्चा करायची आहे. मात्र याबाबत चर्चा संभवत नाही, असे सांगून पेस्कोव्ह यांनी क्रिमिआ हा रशियाचाच भूभाग असल्याचे ठासून सांगितले. तर दुसर्‍या बाजूला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या चर्चेसंदर्भात अगदी विरोधी प्रतिक्रिया दिली. या चर्चेनंतर रशियावर विश्‍वास ठेवता येणार नाही, असा शेरा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मारला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन लवकरच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा युक्रेनच्या मुद्यावर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे वृत्त आहे. युक्रेनमधील जनतेसाठी मानवी सहाय्य पुरविण्याच्या तसेच मारिओपोल तसेच इतर शहरांमधून नागरिकांना बाहेर काढण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मात्र या मानवतावादी सहाय्यापेक्षाही रशियाने आपल्या इंधनाच्या खरेदीसाठी समोर ठेवलेल्या शर्तीवर फ्रान्स विचार करीत असल्याची बाब या चर्चेत समोर आली. यामुळे अमेरिका व इतर पाश्‍चिमात्य देश अस्वस्थ बनल्याचे दिसते.

रशियावर अमेरिकेने निर्बंध लादून अमेरिकेने या देशाची इंधननिर्यात बाधित केली आहे. यामुळे रशियाकडून इंधनाची खरेदी करणारे देश अडचणीत सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत आमच्या इंधनासाठी डॉलर्स नाही तर रशियन चलन रूबलचा वापर करा, अशी अट रशियाने ठेवली आहे. फ्रान्स त्यावर गंभीरपणे विचार करीत असल्याची बाब राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या चर्चेतून उघड झाल्याचे दावे केले जातात.

रशिया युरोपला फुकटात इंधन पुरवायला तयार नाही, असे सांगून दिमित्री पेस्कोव्ह यांनी रशियन इंधनावर अवलंबून असलेल्या युरोपिय देशांना इशारा दिला. तर काही युरोपिय देश देखील इंधनाच्या मुद्यावर रशियाची अरेरावी खपवून घेणार नाही, असे सांगून इंधनासाठी दुसरे पर्याय शोधत आहेत. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अद्याप फारसे यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीतही, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियावरील निर्बंध तीव्र करण्याचे आवाहन ब्रिटनच्या सहकारी देशांना केले आहे. युक्रेनमधून सारे रशियन सैनिक माघारी जात नाही, तोपर्यंत रशियावरील निर्बंधांची तीव्रता वाढविणे भाग आहे, असा संदेश ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिला आहे. मात्र काही युरोपिय देश रशियन इंधनाखेरीज आपल्यासमोर पर्याय नसल्याचे सांगून अमेरिका तसेच ब्रिटनला विरोध करीत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info