युक्रेनने रशियन ऑईल डेपोवर हल्ले चढविल्याचा दावा

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या लष्करी हेलिकॉप्टर्सनी रशियन सीमेवरील इंधनसाठ्यांवर हवाईहल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेन सीमेपासून ४० किलोमीटर्सवर असणार्‍या बेल्गोरोद या शहरात हे हल्ले झाल्याचे सांगण्यात येते. युक्रेनने या हल्ल्यासंदर्भात ठोस माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी या हल्ल्यामुळे दोन देशांमधील चर्चा चालू ठेवण्यात अडथळे येऊ शकतात, असे बजावले आहे. दरम्यान, रशियन फौजा पूर्व युक्रेन तसेच बेलारुसमध्ये एकत्र येत असून मोहिमेची फेरआखणी करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा युक्रेनमधील सूत्रांनी केला आहे.

ऑईल डेपोवर हल्ले

रशिया-युक्रेन सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर्स अंतरावर असलेल्या बेल्गोरोद या रशियन शहरावर शुक्रवारी पहाटे हवाईहल्ला झाला. या हल्ल्यात शहरातील ऑईल डेपोला भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी २००हून अधिक रशियन जवान घटनास्थळी दाखल झाले असून दोन कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. युक्रेनच्या दोन लष्करी हेलिकॉप्टर्सनी हा हल्ला केल्याचा दावा बेल्गोरोदचे गव्हर्नर ग्लॅडकोव्ह यांनी केला आहे. हल्ल्यासाठी ‘एमआय-२४’ या हेलिकॉप्टर्सचा वापर झाल्याचेही सांगण्यात येते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनीही याला दुजोरा दिला. त्याचवेळी अशा हल्ल्यांमुळे रशिया-युक्रेन चर्चेला पोषक स्थिती निर्माण होऊ शकत नाही, याची युक्रेनने जाणीव ठेवावी असा टोलाही लगावला. मात्र युक्रेनने रशियन शहरावरील हल्ल्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी, हल्ला नाकारु शकत नाही तसेच त्याला दुजोराही देता येणार नाही, असे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. युक्रेनच्या संरक्षण विभागानेही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ऑईल डेपोवर हल्ले

यापूर्वी युक्रेनने रशियाच्या एका क्षेपणास्त्र तळावर हल्ला चढविल्याचे दावे समोर आले होते. त्यानंतर रशियन समर्थकांचे वर्चस्व असलेल्या डोनेत्स्क व लुहान्स्कमध्येही युक्रेनच्या लष्कराने हल्ले केल्याची माहिती समोर आली होती. मात्र रशियन हद्दीत घुसून हल्ला होण्याची ही पहिलीच घटना मानली जाते.

दरम्यान, राजधानी किव्ह तसेच जवळच्या उपनगरांमध्ये रशियन लष्कर व युक्रेनदरम्यान संघर्ष अद्यापही सुरू असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी युक्रेनी फौजांनी रशियन तुकड्यांना मागे लोटल्याचे दावे समोर आले होते. मात्र रशियन फौजांनी पुन्हा काही भाग ताब्यात घेतले असून युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने दक्षिण युक्रेनमधील मारिपोल शहरातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी अजून एक संधी उपलब्ध करून दिल्याचे ‘रेडक्रॉस’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info