नाटो पूर्व युरोपात कायमस्वरुपी लष्कर तैनात करणार

- नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग

कायमस्वरुपी लष्कर तैनात

ब्रुसेल्स – रशियाला रोखण्यासाठी नाटो पूर्व युरोपातील सीमाभागांमध्ये कायमस्वरुपी लष्कर तैनात करेल, असे नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी जाहीर केले. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर नाटो आपल्या धोरणांमध्ये मोठे बदल करण्याची तयारी करीत असून पूर्व युरोपातील कायमस्वरुपी तैनाती त्याचाच भाग असेल, असे संकेत स्टॉल्टनबर्ग यांनी यावेळी दिले. सध्या रशियन सीमेला जोडून असलेल्या तीन देशांसह पूर्व युरोपातील इतर देशांमध्ये ४० हजार जवान तैनात असून ते नाटोच्या ‘डायरेक्ट कमांड’खाली असल्याचे स्टॉल्टनबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

कायमस्वरुपी लष्कर तैनात

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर हल्ला चढविण्यापूर्वीच नाटो सदस्य देशांनी युरोपातील लष्करी तैनातीचे संकेत दिले होते. अमेरिकेने युरोपातील तैनातीत ५० हजारांपर्यंत वाढ करण्याची तयारी सुरू केली होती. तर इतर नाटो सदस्य देशांनीही लष्करी तुकड्या पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या आठवड्यात झालेल्या नाटोच्या बैठकीत पूर्व युरोपातील वाढीव लष्करी तैनातीला मान्यता मिळाल्याचे सांगण्यात येते.

नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी ब्रिटीश दैनिकाला दिलेल्या मुलातीत, लष्करी अधिकार्‍यांना दीर्घकालिन तैनातीबाबत योजना तयार करण्याचे निर्देश दिल्याची माहिती दिली. या योजना नाटोच्या रिसेटचा भाग असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘नाटो मोठ्या व मूलभूत बदलांच्या उंबरठ्यावर आहे. हे बदल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलेल्या कारवाईचे दीर्घकालिन परिणाम दाखवून देणारे आहेत. युरोपच्या सुरक्षेचे नवे वास्तव समोर येत आहे’, असे नाटोच्या प्रमुखांनी स्पष्ट केले.

कायमस्वरुपी लष्कर तैनात

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याचे निमित्त पुढे करून अमेरिका व नाटोने युरोपातील आपली तैनाती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स यासारख्या देशांनी पूर्व युरोपिय देशांमध्ये २० हजारांहून अधिक जवान तैनात केले आहेत. त्याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे व इतर शस्त्रांचा पुरवठा सुरू आहे. युरोपमधील नाटो देश युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवित असून त्याबदल्यात अमेरिका या देशांना अत्याधुनिक यंत्रणा पुरवित आहे. अमेरिकेच्या सूचनेनंतर स्लोव्हाकियाने युक्रेनसाठी ‘एस-३००’ ही रशियन बनावटीची हवाई सुरक्षा यंत्रणा रवाना केली आहे. याच्या बदल्यात अमेरिका स्लोव्हाकियामध्ये पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करणार असल्याचे सांगितले जाते.

दुसर्‍या बाजूला ब्रिटनने युक्रेनसाठी १० कोटी पौंडाचे अतिरिक्त संरक्षणसहाय्य जाहीर केले आहे. या सहाय्याअंतर्गत ब्रिटन ‘स्टारस्ट्रिक अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्स’, ८०० रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे व ‘हेवी आर्मर्ड व्हेईकल्स’ युक्रेनमध्ये पाठविणार आहे. नाटोकडून पूर्व युरोपात होणारी तैनाती व युक्रेनला होणार्‍या शस्त्रपुरवठ्याला रशियाने जोरदार विरोध केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या प्रस्तावात अमेरिका व नाटोने युरोपातील लष्करी तैनाती कमी करावी, अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अमेरिका व नाटो रशियन सीमेनजिक कायमस्वरुपी तळाची तयारी करीत असल्याचे स्टॉल्टनबर्ग यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info