रशियाच्या युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा नवा टप्पा सुरू

- परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

मॉस्को/किव्ह – रशियाच्या युक्रेनमधील लष्करी मोहिमेचा नवा टप्पा सुरू झाला आहे, अशी माहिती देशाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिली. रशियाने पूर्व युक्रेनमधील सर्व भागांमध्ये एकाच वेळी व्यापक हल्ले चढविले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही ‘बॅटल ऑफ डोन्बास’ला तोंड फुटल्याचे व ही निर्णायक लढाई असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मारिपोलमधील फॅक्टरीत आश्रय घेतलेल्या युक्रेनी लष्कराच्या तुकडीला रशियाने दिलेली मुदत संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर रशियाने मर्यादित कारवाईची तयारी केल्याचे संकेत मिळत आहेत.

लष्करी मोहिमेचा नवा टप्पा

पूर्व युक्रेनमधील डोेनेत्स्क व लुहान्स्क या प्रांतांचा भाग ‘डोन्बास’ या नावाने ओळखण्यात येतो. एकेकाळी कोळसा व लोखंडांच्या खाणींनी समृद्ध असलेल्या या भागात रशियन वंशाच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. २०१४ साली झालेल्या संघर्षात रशिया समर्थक गटांनी या भागातील एक तृतियांश भागावर ताबाही मिळविला होता. युक्रेनवर कारवाई करण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याच क्षेत्रात युक्रेन सरकारकडून वंशसंहार होत असल्याचा आरोप केले होते. त्यामुळे या भागावर नियंत्रण मिळविणे रशियच्या युक्रेनमधील मोहिमेसाठी निर्णायक टप्पा मानला जातो.

लष्करी मोहिमेचा नवा टप्पा

सोमवारी रशियन फौजांनी डोन्बासमधील सुमारे ५०० किलोमीटर लांबीच्या आघाडीवर हल्ले सुरू केले आहेत. रशियन लष्कराच्या जवळपास ७० बटालियन या मोहिमेत सहभागी झाल्या असून क्षेपणास्त्रांसह तोफा, रणगाडे, रॉकेटस् व मॉटर्सच्या सहाय्याने जोरदार हल्ले सुरू झाले आहेत. रशियन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये युक्रेनी लष्कराच्या हजारांहून अधिक ठिकाणांवर तुफानी हल्ले चढविण्यात आले. यात लष्करी तुकड्या, संरक्षणदलांच्या चौक्या, शस्त्रसाठा, इंधनाचे डेपो, सशस्त्र वाहने यांचा समावेश आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी, रशियाच्या मोहिमेचा नवा टप्पा सुरू झाल्याची माहिती दिली. ‘रशियाच्या युक्रेनमधील मोहिमेचा नवा टप्पा सुरू झाला आहे. रशियाने सुरू केलेल्या कारवाईतील हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. रशियाने आपल्या कारवाईची उद्दिष्टे आधीच जाहीर केली होती आणि डोनेत्स्क व लुहान्स्कवरील ताबा त्याचाच भाग आहे’, अशा शब्दात लॅव्हरोव्ह यांनी नव्या कारवाईची माहिती दिली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही, रशियाच्या नव्या हल्ल्यांकडे लक्ष वेधले. रशियन फौजांनी ‘बॅटल ऑफ डोन्बास’ला आरंभ केला आहे व ते याची तयारी दीर्घकाळापासून करीत होते, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

लष्करी मोहिमेचा नवा टप्पा

पूर्व युक्रेनमध्ये ‘बॅटल ऑफ डोन्बास’ला सुरुवात होत असतानाच अमेरिकेसह ब्रिटन व नेदरलॅण्डस् या देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करण्याची घोषणा केली.

तर अमेरिकेने युक्रेनी लष्कराच्या तुकड्यांना प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनने युक्रेनला नवी क्षेपणास्त्रे व ‘मिसाईल लॉंचर्स’ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तर नेदरलॅण्डस्च्या सरकारने ‘हेवी वेपनरी’ पाठविणार असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच जर्मनीने युक्रेनला एक अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करण्याचे संकेत दिले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info