अमेरिका व ब्रिटन युक्रेनला ‘कंट्रोल’ करीत आहेत

- रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा आरोप

मॉस्को/किव्ह – अमेरिका व ब्रिटनला रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळपर्यंत लांबवायचे असून त्यासाठी ते युक्रेनला नियंत्रित करीत आहेत, असा घणाघाती आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी केला. रशियाविरोधातील ‘हायब्रिड वॉर’मध्ये युक्रेनचा वापर करण्यात येत असल्याची कबुली पाश्चिमात्य देशांनी यापूर्वीच दिली आहे, याकडेही लॅव्हरोव्ह यांनी लक्ष वेधले. रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनीही लॅव्हरोव्ह यांच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात अघोषित युद्ध पुकारले असून त्यासाठी युक्रेनचा वापर करण्यात येत आहे, असा ठपका पत्रुशेव्ह यांनी ठेवला.

रशिया-युक्रेन युद्धाला 80हून अधिक दिवस उलटले आहेत. या कालावधीत रशियाने पूर्व तसेच दक्षिण युक्रेनमधील अनेक शहरे ताब्यात घेतली आहेत. रशियाकडून पश्चिम युक्रेनमधील लिव्ह भागात तसेच राजधानी किव्हनजिकच्या परिसरातही क्षेपणास्त्रहल्ले सुरू आहेत. गेल्या काही दिवसात युक्रेनच्या फौजांनी रशियन सीमेपलिकडील गावांमध्ये हल्ले करण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले आहे. रशियाकडून सातत्याने युद्धाची तीव्रता वाढविण्यात येत असून युक्रेन मोहिमेतील उद्दिष्टे पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला आहे.

युद्ध तीव्र होत असतानाच शांतीचर्चा पूर्णपणे थांबली आहे. रशिया व युक्रेन या दोन्ही देशांनी त्यासाठी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेत आहेत. ‘इस्तंबूलमध्ये झालेल्या चर्चेत युक्रेनने करारासाठी स्वीकारार्ह ठरतील असे प्रस्ताव दिले होते. मात्र त्यांनी मांडलेल्या संकल्पना पाश्चिमात्य देशांना मान्य नसल्याचे सांगण्यात आले. युक्रेनवर अमेरिका व ब्रिटनचे नियंत्रण असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे’, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी केला.

‘अमेरिका व ब्रिटन युक्रेनच्या हालचालींबाबत निर्णय घेतात. अमेरिका व ब्रिटनला रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळपर्यंत लांबवायचे आहे. युद्ध जितका जास्त काळ चालेल तितकी रशियन लष्कराची जास्त हानी करता येईल, हा त्यांचा हेतू आहे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन व एकूणच पाश्चिमात्य देशांनी शांतीकरारासाठी कोणतेही ठोस प्रस्ताव दिलेले नाहीत’, असा दावा रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केला. अमेरिका, ब्रिटन व युरोपिय नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रशिया हे युद्ध जिंकता कामा नये, अशी वक्तव्ये वारंवार केली आहेत, याकडेही लॅव्हरोव्ह यांनी लक्ष वेधले. रशियाविरोधात ‘हायब्रिड वॉर’ सुरू असून युक्रेन त्याचा भाग असल्याची कबुली पाश्चिमात्य देशांनी वारंवार दिली असल्याचेही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्या वक्तव्याचे रशियाच्या सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनीही समर्थन केले. ‘अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियाविरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून मोठ्या प्रमाणात निर्बंधही लादले आहेत. ही बाब युक्रेन म्हणजे केवळ रशियाविरोधातील अघोषित युद्धासाठी पुढे केलेले कारण आहे, हे सिद्ध करते’, असे पत्रुशेव्ह यांनी सांगितले.

English    हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info