डोन्बासमधील तीव्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर; युक्रेनने रशियाबरोबरील संघर्षबंदीची शक्यता फेटाळली

किव्ह – रशियाकडून युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी करण्यात येणारे हल्ले दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही या क्षेत्रातील प्रखर रशियन हल्ल्यांची कबुली देताना युक्रेनी फौजांसाठी परिस्थिती अत्यंत खडतर बनल्याचे म्हटले होते. असे असले तरी युक्रेन रशियाबरोबर संघर्षबंदीसाठी तयार होणार नाही, असा इशारा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. संघर्षबंदी अथवा रशियाला दिलेली कोणतीही सवलत युक्रेनवर उलटू शकते, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्षीय सल्लागार मायखेलो पोडोलिआक यांनी बजावले. त्यामुळे येत्या काही दिवसात रशिया व युक्रेन युद्धाचा भडका अधिकच वाढण्याचे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत.

रशियाने डोन्बास क्षेत्रातील लुहान्स्क व डोनेत्स्क या दोन्ही प्रांतांवर तीव्र हल्ले सुरू ठेवले आहेत. डोन्बास क्षेत्रातील जवळपास 10हून अधिक शहरांवर एकाच वेळी क्षेपणास्त्रे, रॉकेटस्‌‍ तसेच तोफांच्या सहाय्याने मारा सुरू आहे. लुहान्स्क प्रांतातील सेव्हेरोडोनेत्स्क व लिशान्स्क तर डोनेत्स्कमधील स्लोव्हिआन्स्क ही शहरे रशियाचे प्रमुख लक्ष्य मानली जातात. रशियाने मारिपोल तसेच किव्हवरील हल्ल्यांसाठी वापरलेल्या लष्करी तुकड्या या भागात तैनात केल्या आहेत. त्याचवेळी प्रगत रणगाडे, तोफा तसेच रॉकेट सिस्टिम्सची संख्या वाढविली आहे.

रशियाच्या या प्रखर माऱ्यामुळे युक्रेनी फौजांना हळुहळू माघार घेणे भाग पडत असून येत्या काही दिवसात युक्रेन डोन्बासवरील नियंत्रण गमावून बसेल, असे चित्र दिसत आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी गेल्या काही दिवसात सातत्याने या क्षेत्रातील संघर्षाबाबत वक्तव्ये केली असून युक्रेनी फौजांची स्थिती खडतर बनल्याची कबुली दिली. डोन्बासमध्ये पिछेहाट होत असताना युक्रेनकडून पुन्हा शांतीचर्चा व राजनैतिक वाटाघाटींची भाषा सुरू झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाची अखेर केवळ राजनैतिक वाटाघाटींनीच होऊ शकते, असे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नुकतेच म्हटले होते.

मात्र त्याला काही तास उलटत नाहीत तोच राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी संघर्षबंदीची शक्यता फेटाळणे लक्ष वेधून घेणारे ठरते. ‘रशियाबरोबरील संघर्षबंदीला युक्रेन मान्यता देणार नाही. युक्रेनच्या भागांवर ताबा मिळवून रशियाने शांतीकराराचा प्रस्ताव दिल्यास हा प्रस्ताव आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रशियाला कोणत्याही प्रकारच्या सवलती देणे युक्रेनवर उलटू शकते. या सवलती दिल्यानंतर युद्ध काही काळ थांबल्यासारखे वाटेल. पण त्यानंतर रशिया अधिक व्यापक व रक्तरंजित हल्ले चढविल’, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्षीय सल्लागार मायखेलो पोडोलिआक यांनी बजावले.

दरम्यान, अमेरिकेने रशियन नौदलाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’ला उद्ध्वस्त करण्यासाठी युक्रेनला सहाय्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे, असा खळबळजनक दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला. ‘अमेरिकेने रशियाच्या ब्लॅक सीमधील नौदल पथकाला नष्ट करण्यासाठी योजना बनविली आहे. युक्रेनची बंदरे मोकळी करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अमेरिका युक्रेनला हार्पून तसेच नेव्हल स्ट्राईक मिसाईल्सचा पुरवठा करू शकते’, असे युक्रेनचे अधिकारी ॲन्टोन गेराशेन्को यांनी सांगितले. युक्रेनी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर अमेरिकेकडून तात्काळ प्रतिक्रिया उमटली असून अशी कोणतीही योजना नसल्याचा खुलासा संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केला. यापूर्वी रशियाची ‘मोस्कव्हा’ ही युद्धनौका उडविण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला सहाय्य केल्याचे दावेही प्रसिद्ध झाले होते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info