धोका वाढल्यास रशिया अणुहल्ला चढविल्यावाचून राहणार नाही

- पाश्चिमात्यांना रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या युद्धाला 100 दिवस पूर्ण झाले असून रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागावरील हल्ले अधिकच तीव्र केले आहेत. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनला दिवसाकाठी सुमारे 60 ते 100 जवान गमवावे लागत असल्याची कबुली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. मात्र लवकरच युक्रेनच्या हाती अमेरिकेची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पडतील व त्याने युक्रेनच्या प्रतिकाराची धार वाढेल, असे दावे केले जातात. मात्र आपल्यासमोरील धोक्यात वाढ झालीच, तर रशिया अण्वस्त्रांचा वापर करील, हे आमच्या विरोधात डावपेच आखणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह यांनी बजावले आहे.

अणुहल्ला

अमेरिकेने युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या हल्ल्यासमोर युक्रेनच्या लष्कराची दैना उडत असताना, अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचे महत्त्व वाढलेआहे. तसेच युरोपिय देशांनीही युक्रेनला अधिक लष्करी सहाय्य पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. यावर रशियाची करडी नजर रोखलेली आहे, याची जाणीव माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी करून दिली. युक्रेनच्या युद्धाची भयावहता वाढत गेली, तर यातून अणुयुद्ध पेट घेऊ शकते, असे इशारे रशियाने याआधीही दिले होते. माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी पुन्हा एकदा पाश्चिमात्यांना या धोक्याची जाणीव करून दिली.

असे घडूच शकत नाही, या भ्रमात कुणीही राहू नये, असा इशारा मेदवेदेव्ह यांनी दिला. रशियन संरक्षणदलांचे प्रमुख असलेले राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन अण्वस्त्रांच्या वापराचे आदेश देऊ शकतात. रशियावर अणुहल्ला झाल्यास, त्याला उत्तर देण्यासाठी तत्काळ अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो. त्याचवेळी रशियाविरोधात अण्वस्त्रांचा वापर झालेला नसला आणि पारंपरिक शस्त्रास्त्रांनी रशियाच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाला, तरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष अणुहल्ल्याचे आदेश देऊ शकतात, ही बाब मेदवेदेव्ह यांनी लक्षात आणून दिली. यामुळे आधी असे घडले नव्हते म्हणून यापुढही असे घडणार नाही, या गैरसमजात कुणालाही राहता येणार नाही, असे इशारा मेदवेदेव्ह यांनी दिला. रशियाच्या विरोधात डावपेच आखणाऱ्यांनी अणुयुद्धाची शक्यता विचारात घ्यावे, त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे मेदवेदेव्ह पुढे म्हणाले. अणुयुद्ध कुणाच्याही भल्याचे नसेल आणि रशियालाही याची जाणीव आहे, असे सांगून मेदवेदेव्ह यांनी पाश्चिमात्यांनी यासाठी रशियाला प्रवृत्त करू नये, असे आवाहन केले.

अणुयुद्धाची भीषणता जगाने अनुभवलेली आहे. अमेरिकेनेच हा अणुहल्ला चढविला होता, याची आठवण मेदवेदेव्ह यांनी करून दिली. याआधी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनच्या संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात होऊ शकते, असा इशारा दिला होता. पाश्चिमात्यांनी या धोक्याकडे दुर्लक्ष करू नये, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनीही बजावले होते. त्याचा विशेष प्रभाव अमेरिका व नाटोचे सदस्य असलेल्या युरोपिय देशांवर पडला नव्हता. मात्र रशियाने न्यूक्लिअर ड्रीलचे आयोजन करून आपले इशारे पोकळ नाहीत, हे दाखवून दिले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info