अमेरिकेत स्वातंत्र्यदिनी झालेल्या गोळीबारात सहा जणांचा बळी

गोळीबारात

वॉशिंग्टन/शिकागो – अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या परेडमध्ये झालेल्या गोळीबारात सहा जणांचा बळी गेला असून 36 जण जखमी झाले आहेत. शिकागोतील हायलँड पार्क भागात ही घटना घडली. हल्लेखोर रॉबर्ट क्रायमो थ्री 22 वर्षांचा तरुण असून सुरक्षायंत्रणांनी त्याला तब्बल आठ तासाच्या शोधमोहिमेनंतर ताब्यात घेतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यावर तीव्र शोक व्यक्त केला असून ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शिकागोतील या घटनेपाठोपाठ फिलाडेल्फियामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली.

गोळीबारात

4 जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन असून देशातील अनेक शहरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिकागोतील हायलॅण्ड पार्कमध्येही सकाळी दहाच्या सुमारास संचलन आयोजित करण्यात आले होते. संचलन सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांनी सेकंड स्ट्रीटजवळच्या भागातून गोळीबार सुरू झाला. हल्लेखोर रॉबर्ट क्रायमोने गोळीबार करण्यासाठी मोठ्या दुकानाच्या गच्चीचा वापर केला. गच्चीवर बंदूक ठेऊन संचलनावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामुळे संचलनात एकच गोंधळ उडाला आणि त्यात सहभागी झालेल्या तसेच ते पाहण्यासाठी आलेल्यांची धावपळ उडाली.

यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही जण जखमी झाल्याची माहिती सुरक्षायंत्रणांनी दिली. गोळीबारात पाच जणांचा जागीच बळी गेला तर एक व्यक्ती रुग्णालयात नेताना मृत्यू पावल्याचे सांगण्यात येते. गोळीबार व चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची संख्या 36 झाल्याचे पोलीसांनी सांगितले. गोळीबारानंतर हल्लेखोराने पळ काढण्यात यश मिळविले. जवळपास आठ तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलीसांनी हायवेवरून हल्लेखोराला ताब्यात घेतले.

गोळीबारात

हल्लेखोर रॉबर्ट क्रायमो थ्री गायक व संगीतकार असून त्याने ‘स्पॉटिफाय’ या वेबसाईटवर नुकताच ‘ब्रेनवॉश्ड्’ नावाचा अल्बम प्रसिद्ध केला होता. याव्यतिरिक्त त्याने सोशल मीडियावर ‘गन व्हायोलन्स’ तसेच ‘मास शूटिंग’चे समर्थन करणारी चित्रे तसेच पोस्ट टाकल्याचे समोर आले आहे. शिकागोत घडलेल्या घटनेनंतर रात्री फिलाडेल्फियामध्येही स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात गोळीबार झाल्याची घटना समोर आली. या घटनेत दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती देण्यात आलीआहे.

शिकागोत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अमेरिकेत ‘गन व्हायोलन्स’ची साथ असून त्याविरोधातील आपला संघर्ष सुरू राहिल, असेही बायडेन म्हणाले. अमेरिकेत गेल्या दोन महिन्यात घडलेली मास शूटिंगची ही तिसरी मोठी घटना आहे. मे महिन्यात न्यूयॉर्क तसेच टेक्सास प्रांतात मास शूटिंगच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. न्यूयॉर्क शहरातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत 10 जणांचा बळी गेला होता. तर टेक्सास प्रांतातील शाळेत झालेल्या गोळीबारात 20 जणांचा बळी गेला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info