रशियाने युक्रेनविरोधातील खरे युद्ध अद्याप सुरुही केलेले नाही

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

खरे युद्ध

मॉस्को/किव्ह – रशियाने युक्रेनविरोधातील खरे युद्ध अजून सुरुदेखील केलेले नाही, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. ‘शेवटचा युक्रेनियन उभा असेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचे दावे पाश्चिमात्यांकडून करण्यात येत आहेत. ही युक्रेनी जनतेची शोकांतिका आहे. पण सध्या सुरु असलेला संघर्ष याच दिशेने जात असल्याचे दिसते’, या शब्दात पुतिन यांनी रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळपर्यंत चालेल असे संकेत दिले. पुतिन अधिक तीव्र संघर्षाचे संकेत देत असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी कोणत्याही परिस्थितीत युक्रेन आपल्याकडील भूभाग सोडणार नाही, असे बजावले.

खरे युद्ध

काही दिवसांपूर्वीच युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतावर ताबा मिळविल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पुढील संघर्ष कायम ठेवण्याबाबत संकेत दिले होते. गुरुवारी घेतलेल्या बैठकीतून पुतिन यांनी या संकेतांना स्पष्ट दुजोरा दिल्याचे दिसते. रशियाच्या सत्ताधारी पक्षाच्या बैठकीत त्यांनी रशिया युक्रेनविरोधात दीर्घकाळ संघर्षासाठी सज्ज असल्याचे बजावले. ‘युक्रेन व पाश्चिमात्य देश युद्धभूमीवर रशियाचा पराभव करण्याची भाषा करीत आहे. त्यांना हवे तितके प्रयत्न करू देत, आपण त्याच्यावर काही बोलणार नाही’, असे पुतिन यांनी स्पष्ट केले.

खरे युद्ध

पुतिन दीर्घकालिन संघर्षाकडे लक्ष वेधत असतानाच युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनीही आक्रमक इरादे बोलून दाखविले आहेत. युक्रेनची जनता आपला कोणताही भूभाग सोडणार नाही, अशा शब्दात झेलेनस्की यांनी रशियाला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पाश्चिमात्य देशांकडून जलद तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसहाय्याची मागणीही केली. रशियन फौजांनी लुहान्स्कवर ताबा मिळविल्याची कबुलीही झेलेन्स्की यांनी दिली. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला भेट देऊन रशियासह जगाला संदेश द्यावा, असेही युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी नमूद केले.

खरे युद्ध

दरम्यान, रशियाने युक्रेनमधील आपल्या हल्ल्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. डोनेत्स्क प्रांतातील तब्बल 40 ठिकाणांवर एकाचवेळी हल्ले सुरू असल्याची माहिती रशियाच्या संरक्षणदलाने दिली. यात स्लोव्हिआन्स्क, क्रॅमाटोर्स्क व बाखमतमधील जागांचा समावेश आहे. रणगाडे, तोफा व रॉकेटस्‌‍च्या सहाय्याने जबरदस्त मारा सुरू असून रशियाने काही गावे बेचिराख केल्याची माहिती युक्रेनने दिली.

डोनेत्स्कबरोबरच दक्षिण युक्रेनमधील ओडेसामध्येही क्षेपणास्त्रहल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ब्रिटनने युक्रेनला दिलेल्या हार्पून क्षेपणास्त्र यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले. तर ओडेसाजवळील स्नेक आयलंडवर युक्रेनने मिळविलेला ताबा रशियासाठी इशारा असल्याचे युक्रेनी लष्कराने बजावले आहे.

काही दिवसांपूर्वीच रशियाने अमेरिकेच्या ‘हायमार्स’ रॉकेट सिस्टिम्सही उडवून दिल्याचे सांगितले होते. याव्यतिरिक्त रशियाने खार्किव्ह तसेच सुमी शहरांवर हल्ले केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info