स्लोव्हियान्स्कवरील हल्ल्यात शंभर युक्रेनी जवान मारल्याचा रशियाचा दावा

हल्ल्यात

मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील स्लोव्हियान्स्क शहरातील तळावर केलेल्या हल्ल्यात युक्रेनी लष्कराच्या 100 जवानांना मारल्याचा दावा रशियाच्या संरक्षणदलाने केला. यावेळी अमेरिकी शस्त्रसाठ्यासह तब्बल 700 रॉकेट्स नष्ट केल्याचेही रशियन संरक्षणदलाकडून सांगण्यात आले. तर डोनेत्स्कवर झालेल्या रॉकेटहल्ल्यात 15हून अधिक जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. दरम्यान, युक्रेनसरकारकडून देशातील नागरिकांवर लष्करात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असल्याचे वृत्त ब्रिटीश दैनिकाने दिले आहे.

हल्ल्यात

दोन दिवसांपूर्वीच रशियाने युक्रेनविरोधातील खरे युद्ध अजून सुरुदेखील केलेले नाही, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला होता. त्यानंतर रशियाकडून डोनेत्स्क तसेच खार्किव्हवरील हल्ल्यांसाठी लष्करी पथकांची पुनर्रचना सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात रशियाकडून युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढविण्यात आल्याचे दिसत आहे. शुक्रवारी रशियन फौजांनी एकाचवेळी डोनेत्स्क प्रांतातील तब्बल 40 ठिकाणांवर हल्ले चढविले होते. अशाच स्वरुपाचे हल्ले युक्रेनच्या इतर भागांमध्येही सुरू झाल्याचे दिसते.

हल्ल्यात

डोन्बासचा भाग असलेल्या स्लोव्हियान्स्क तसेच डोनेत्स्कवर शनिवारी केलेले हल्ले याला दुजोरा देणारे ठरतात. शनिवारी रशियन फौजांनी स्लोव्हियान्स्क शहरातील फॅक्टरीत युक्रेनी लष्कराने उभारलेल्या तळाला लक्ष्य केले. यासाठी ‘हाय प्रिसिजन वेपन्स’चा वापर करण्यात आले. या हल्ल्यात युक्रेनच्या तळावरील जवळपास 100 जवान मारले गेल्याचा दावा रशियन संरक्षणदलांच्या प्रवक्त्यांनी केला.

हल्ल्यात

हल्ल्यामध्ये तळावर ठेवलेला मोठा परदेशी शस्त्रसाठाही नष्ट करण्यात आला. त्याचवेळी युक्रेनी बनावटीची 700 रॉकेट्स नष्ट झाल्याचेही रशियाने म्हटले आहे. स्लोव्हियान्स्कपाठोपाठ डोनेत्स्क शहरावरही रॉकेट्सचा जोरदार मारा करण्यात आला. यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून 15हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती युक्रेनने दिली आहे.

दरम्यान, रशियन फौजांकडून सुरू असणाऱ्या आक्रमक माऱ्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागत आहे. अवघ्या महिन्याभरात युक्रेनने 20 हजारांहून अधिक जवान गमावले आहेत. तर सध्या सुरू असणाऱ्या संघर्षात दरदिवशी किमान 200 जवानांचा मृत्यू होत असल्याचे समोर येते. या पार्श्वभूमीवर रशियाविरोधातील युद्ध सुरू ठेवण्यासाठी युक्रेन सरकारने आता आपल्या नागरिकांची जबरदस्तीने सैन्यभरती सुरू केली आहे. यामुळे युक्रेनच्या जनतेत नाराजीचे वातावरण असून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याविरोधात रोष निर्माण होत असल्याचे वृत्त ‘डेलि मेल’ या ब्रिटीश दैनिकाने दिले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info