दक्षिण युक्रेनमधील रशियाच्या ताब्यात असलेल्या प्रांतांवर प्रतिहल्ले चढविणार

- युक्रेनच्या नेत्यांचा इशारा

रशियाच्या ताब्यात

मॉस्को/किव्ह – रशियाच्या ताब्यात असलेल्या दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतांवर प्रतिहल्ले चढविण्याच्या हालचाली युक्रेनी लष्कराने सुरू केल्या आहेत. या हल्ल्यांपूर्वी सदर प्रांतांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी ताबडतोब या क्षेत्रातून स्थलांतर करावे, असे आवाहन युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी केले. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनीही, दक्षिण युक्रेनवर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी ‘मिलियन स्ट्राँग आर्मी’ सज्ज करण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले. तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या फौजांना खेर्सन व झॅपोरिझिआमध्ये चांगले यश मिळत असल्याचा दावा केला.

रशियाच्या ताब्यात

पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणाऱ्या रशियन फौजांनी दक्षिण युक्रेनमधील खेर्सन व झॅपोरिझिआ प्रांतातील मोठा भागही ताब्यात घेतला आहे. प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, रशियाने खेर्सनमधील जवळपास 90 टक्के भागावर नियंत्रण मिळविले असून झॅपोरिझिआ प्रांतातील 75 टक्के क्षेत्र ताब्यात घेतले आहे. खेर्सनमध्ये रशियाच्या समर्थनार्थ सार्वमत घेण्याची तयारीही सुरू असल्याचे सांगण्यात येते. ब्लॅक सी सागरी क्षेत्राचा भाग असलेले हे प्रांत युक्रेनची शेती व व्यापार या दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

रशियाने मिळविलेल्या ताब्यामुळे युक्रेन अस्वस्थ असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी, युक्रेनी जनता आपला भूभाग सोडणार नाही असे बजावले होते. पाश्चिमात्य देशांकडून प्रगत शस्त्रांची मागणी करतानाही युक्रेनने गमावलेला भाग परत मिळविण्यासाठी हे सहाय्य उपयुक्त ठरेल, असे दावे करण्यात येत आहे. यापूर्वी युक्रेनने राजधानी किव्ह तसेच खार्किव्हमधून रशियन सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले होते. मात्र आता रशियाने ताब्यात घेतलेल्या प्रांतांवर प्रतिहल्ले चढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रशियाच्या ताब्यात

युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक तसेच संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांच्यासह राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबाबत केलेली वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरतात. मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये याबाबत नाराजी असल्याचेही उघड झाले. डोन्बास क्षेत्रात युक्रेनी लष्कराला दररोज मोठी हानी सोसावी लागत असताना दक्षिणेत नवी कारवाई हाती घेणे युक्रेनसाठी अशक्यप्राय गोष्ट ठरते असे पाश्चिमात्य नेते तसेच विश्लेषकांचे मत आहे. सध्या रशियाला सामरिक आघाडीवर मिळत असलेले यश पाहता दक्षिण युक्रेनमधून त्यांच्यावर प्रतिहल्ला चढविण्याच्या गोष्टी करणे युक्रेनला झेपणार नाही, असे विश्लेषकांनी स्पष्टपणे बजावले आहे.

दरम्यान, युक्रेन प्रतिहल्ल्याच्या योजना आखत असतानाच रशियाने दक्षिण युक्रेनमधील मोक्याचे बंदर असलेल्या ओडेसावर सात क्षेपणास्त्रांचा मारा केल्याची माहिती युक्रेनी यंत्रणांनी दिली.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info