रशिया-युक्रेन युद्धानंतर बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था आकारास येईल

- हंगेरीच्या पंतप्रधानांचा इशारा

बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था

बुडापेस्ट – रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्यांचे वर्चस्व संपुष्टात येणार असून नवी बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था आकारास येईल, असा इशारा हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी दिला. पंतप्रधान ऑर्बन यांनी, युद्ध रोखण्यासाठी रशियावर लादलेले निर्बंध सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही केला. पाश्चिमात्यांनी आता नवे धोरण राबवायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रशियावर निर्बंध टाकून युरोपने आपल्या फुफ्फुसांवर गोळी झाडल्याचा घणाघाती टोला लगावला होता.

बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था

फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या युद्धामुळे अमेरिका व युरोपच्या रशियाबरोबरील संबंधांमध्ये टोकाचा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका, युरोपसह इतर पाश्चिमात्य देश रशियाचा जागतिक स्तरावरील प्रभाव संपविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असून त्यासाठी जबर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र या निर्बंधांनंतरही रशियाचे युक्रेनवरील आक्रमण रोखण्यात तसेच त्याच्या प्रभावाला मोठा धक्का देण्यात पाश्चिमात्यांना फारसे यश मिळालेले नाही. उलट रशिया-युक्रेन संघर्ष हा पाश्चिमात्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे भडकल्याचे चित्र तयार होत आहे.

बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था

या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात काही पाश्चिमात्य नेते, मुत्सद्दी तसेच विश्लेषक जागतिक व्यवस्थेतील पाश्चिमात्यांचे वर्चस्व संपुष्टात येत असल्याची जाणीव करून देत आहेत. यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ तसेच ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचा समावेश आहे. हंगेरीच्या पंतप्रधानांनीही आपल्या वक्तव्यातून याकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.

बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था

‘रशिया-युक्रेन संघर्षाच्या मुद्यावर जग आपल्या बाजूने नाही आणि ते तसे दाखविण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला नाही. या संघर्षामुळे पाश्चिमात्यांचे वर्चस्व सहजगत्या संपुष्टात येऊ शकते. यातून नवी बहुस्तंभीय जागतिक व्यवस्था आकारास येईल’, असे हंगेरीच्या पंतप्रधानांनी बजावले. पाश्चिमात्यांनी यापुढे नवे धोरण राबविण्याची गरज असून त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असेही ऑर्बन पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी युरोपिय महासंघावर टीकास्त्र सोडून रशियाविरोधातील निर्बंधांचे धोरण सपशेल फसल्याचा ठपकाही ठेवला.

गेल्याच महिन्यात, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जुनी जागतिक व्यवस्था पुन्हा प्रस्थापित होणार नाही, असा इशारा दिला होता. तर युक्रेन हल्ल्याच्या धक्क्यामुळे नव्या बहुस्तंभीय जगाने आकार घेतला असून जागतिकीकरणाच्या टप्प्याची अखेर होण्यास सुरुवात झाली आहे, अशी कबुली जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी दिली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info