अणुयुद्ध भडकल्यास बळींची संख्या पाच अब्जावर जाईल

- अमेरिकेतील ‘रुटगर्स युनिव्हर्सिटी’च्या अहवालातील इशारा

वॉशिंग्टन – ‘अमेरिका व रशियामध्ये अणुयुद्धाचा भडका उडालाच, तर त्याचे दूरगामी परिणाम जगातील शेतीवर होऊन अनेक देशांमधील जनतेला भयावर उपासमारीला तोंड द्यावे लागेल. यामुळे काही वर्षातच जगातील पाच अब्ज जणांचा मृत्यू होईल’, असा इशारा अमेरिकेच्या ‘रुटगर्स युनिव्हर्सिटी’ने दिला. विद्यापीठातील संशोधकांनी अणयुद्ध व त्याच्या परिणामांसंदर्भात सहा विविध शक्यता वर्तविल्या असून त्यातील ‘अमेरिका-रशिया अणुयुद्ध’ सर्वाधिक संहारक व विनाशकारी असेल, असे बजावले आहे. काही दिवसांपूर्वीच, युक्रेनमधील युद्ध आणि आशिया व आखातातील आण्विक धोक्यांकडे लक्ष वेधून, एक चूक मानवतेला आण्विक विनाशाकडे नेऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघटनेचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी दिला होता.

रुटगर्स विद्यापीठातील ‘डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्सेस’च्या संशोधकांनी अणुयुद्धासंदर्भातील अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. ‘न्यूक्लिअर वॉर वूड कॉज्‌‍ ए ग्लोबल फेमाईन ॲण्ड किल बिलिअन्स’ नावाच्या या अहवालात अणुयुद्धाच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. यात अणुयुद्धाच्या सहा शक्यता मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी पाच शक्यता ‘भारत-पाकिस्तान’मधील अणुयुद्धाच्या असून सहावी शक्यता अमेरिका-रशिया अणुयुद्धाची आहे.

भारत व पाकिस्तान तसेच अमेरिका व रशियाकडे असलेली अण्वस्त्रांची संख्या आणि त्यांचा वापर यावर संशोधकांनी हे अंदाज वर्तविले आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या आगीच्या प्रचंड लोळाने सूर्याकडून मिळणाऱ्या प्रकाश व ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील पाच वर्षात जगातील शेतीचे उत्पादन व अन्नधान्याचे प्रमाण यात जवळपास सात टक्क्यांची घट होईल. या घसरणीमुळे जगातील कोट्यावधी जनतेवर उपासमारीची वेळ ओढावून त्यात त्यांचा बळी जाऊ शकतो. आफ्रिका व आखाती देशांना याची सर्वाधिक हानी सहन करावी लागेल, असे रुटगर्स विद्यापीठाच्या अहवालात बजावण्यात आले.

अमेरिका व रशियात अणुयुद्धाचा भडका उडाल्यास अवघ्या दोन वर्षात जगातील ७५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवर उपासमारीचे भयावह संकट ओढावेल, अशी भीती अहवालात व्यक्त करण्यात आली. या अणुयुद्धामुळे तीन ते चार वर्षात जगातील तब्बल ९० टक्के शेती नष्ट होण्याचा धोका आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले. शेतीबरोबरच पाळीव प्राणी व माशांच्या उत्पादनावरही मोठे परिणाम होऊन त्याचा तुटवडा निर्माण होईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले. अमेरिका-रशिया अणुयुद्धामुळे पृथ्वीवरील ओझोनचा थर नष्ट होईल व घातक अतिनील किरणे पृथ्वीवर आल्यावर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशाराही रुटगर्सच्या संशोधकांनी दिला.

अणुयुद्ध कधीच होऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, ही बाब या अहवालातील माहितीने अधोरेखित होते, अशी प्रतिक्रिया रुटगर्स विद्यापीठातील संशोधक ॲलन रोबोक यांनी दिली. गेल्या वर्षी स्वीडिश अभ्यासगट ‘सिप्री’ने जाहीर केलेल्या अहवालात, जगभरातील नऊ अण्वस्त्रसज्ज देशांकडून तैनात करण्यात आलेल्या अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्रसंघटनेत पार पडलेल्या बैठकीत, संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या महासचिवांनी आण्विक विनाशाबाबत इशारा देऊन अण्वस्त्रांच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली होती.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info