डोन्बाससह दक्षिण युक्रेनमध्ये रशियन लष्कराची आगेकूच

- रशियाच्या संरक्षण विभागाची माहिती

डोन्बाससह दक्षिण युक्रेनमध्ये

मॉस्को – युक्रेनकडून कडव्या प्रत्युत्तराचे दावे केले जात असतानाच डोन्बाससह दक्षिण युक्रेनमध्ये रशियन लष्कराने आगेकूच केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. दक्षिण युक्रेनमधील खेर्सन तसेच मायकोलेव्ह प्रांतातील नव्या भागांवर रशियन फौजांनी ताबा मिळविला. तर डोन्बास क्षेत्रात रशियन आघाडीवर होणारे युक्रेनचे हल्ले परतविण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह तसेच इझियम या भागांवरही नवे हल्ले केल्याचे रशियाने म्हटले आहे.

डोन्बाससह दक्षिण युक्रेनमध्ये

गेल्या महिन्यात युक्रेनने रशियाविरोधात प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. बुधवारी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक व्यापक व तीव्र करण्याचे इशारे युक्रेनच्या लष्करी अधिकारी तसेच नेत्यांकडून देण्यात आले होते. परदेशी शस्त्रसाठा, तंत्रज्ञान व गुप्तचर यंत्रणांकडून मिळणारी माहिती या जोरावर युक्रेनने रशियन फौजांना काही धक्के देण्यात यश मिळविले होते. मात्र हे यश फार काळ टिकले नसल्याचे रशियाने केलेल्या नव्या आक्रमक हल्ल्यांवरून दिसून येते.

डोन्बाससह दक्षिण युक्रेनमध्ये

दक्षिण युक्रेनमधील युक्रेनच्या वाढत्या प्रतिहल्ल्यांना रोखण्यात रशियन फौजांनी यश मिळविले आहे. त्याचवेळी नव्या भागांमध्ये आगेकूच करण्यात सुरुवात केल्याचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितले. खेर्सन प्रांतातील अलेक्झांड्रोव्हका शहरातील युक्रेनी आघाडी तोडण्यात आली असून यात युक्रेनी लष्कराची मोठी हानी घडविल्याचे रशियाने म्हटले आहे. त्यापाठोपाठ खेर्सनला जोडून असलेल्या मायकोलेव्ह प्रांताच्या राजधानीजवळच्या गावांसह 12 चौरस किलोमीटरचा भाग रशियन फौजांनी ताब्यात घेतला आहे.

पूर्व युक्रेनमधील डोन्बास भागात बाखमत तसेच डोनेत्स्क शहराबाहेरील काही क्षेत्रावरही रशियन फौजांनी नियंत्रण मिळविले आहे. ईशान्य युक्रेनमधील खार्किव्ह प्रांतात तसेच इझियम शहरानजिकचा काही भागही ताब्यात घेतल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने सांगितले. पुढील काही दिवसात रशिया डोन्बास क्षेत्रातील महत्त्वाचे शहर ताब्यात घेईल, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. रशियाच्या या नव्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांच्या आघाडीत अस्वस्थता निर्माण होईल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info