बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानातील माघारीमुळे अमेरिकेवर ९/११ सारखे हल्ले होतील

- अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा इशारा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या लज्जास्पद माघारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. यामुळे अमेरिकेवर पुन्हा एकदा ९/११ सारख्या भयंकर हल्ल्याचा धोका संभवतो. तसे झाले तर अफगाणिस्तानातील अमेरिकेची अपमानास्पद सैन्यमाघार याला कारणीभूत असेल, अशा खणखणीत शब्दात माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अमेरिकन जनतेला बजावले आहे. इतकेच नाही तर अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला चढविल्याचा आरोप पॉम्पिओ यांनी केला आहे.

९/११

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीपद भूषविलेले माईक पॉम्पिओ यांनी या देशाची विख्यात गुप्तचर संस्था ‘सीआयए’चे प्रमुख म्हणूनही काम पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसते. २० वर्षांपूर्वी न्यूयॉर्कवर भीषण दहशतवादी हल्ला झाला आणि अफगाणिस्तानचा वापर करून याचा कट आखण्यात आला होता. आत्ता देखील अफगाणिस्तानचा वापर करून अमेरिकेच्या न्यूयॉर्कपासून ते कॅलिफोर्नियापर्यंत कुठेही भीषण दहशतवादी हल्ला होऊ शकतो. कारण अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यामुळे अमेरिका अधिकच असुरक्षित बनलेली आहे. या सैन्यमाघारीला एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर जे काही घडत आहे, ते पाहून हा निष्कर्ष नक्कीच नोंदविता येईल, असे पॉम्पिओ पुढे म्हणाले.

एका रेडिओ कार्यक्रमात बोलताना पॉम्पिओ यांनी बायडेन प्रशासनाला अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीसाठी धारेवर धरले. या माघारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेची मानहानी झाली. अमेरिकन विमानांना लटकून आपला देश सोडू पाहणाऱ्या अफगाणींना आपण पाहिले आहे. त्यानंतर २०२१ सालच्या ऑगस्ट महिन्यात काबुलमधील विमानतळावर ‘आयएस’च्या आत्मघाती हल्ल्यात अमेरिकेच्या पथकातील १३ जणांचा बळी गेला होता. हे सारे सैन्यमाघारीनंतर काय घडेल याची झलक दाखविणारे होते, असा दावा माईक पॉम्पिओ यांनी केला.

९/११

अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीमुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला चढविला. कारण अमेरिका आपल्या विरोधात काहीही करू शकणार नाही, याची पुतिन यांना खात्री पटलेली आहे, असा आरोप पॉम्पिओ यांनी केला. त्यामुळे पुढच्या काळात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची अफगाणिस्तानातील ही माघार अमेरिकेला खूपच महाग पडेल, असे सांगून पॉम्पिओ यांनी त्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. अमेरिका धोक्यात आलेली असताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन मात्र मध्यावधी निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी धडपडत आहेत, अशी घणाघाती टीका पॉम्पिओ यांनी केली. तसेच अमेरिकन लष्कर ‘वोक’ अर्थात दांभिकांच्या हाती पडत असून देशाच्या महत्त्वाच्या संस्था भ्रष्ट बनत आहेत. यामुळे न्यूयॉर्कपासून कॅलिफोर्निपर्यंतच्या प्रत्येकासाठी ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची जीवनशैली विकसित केली जात असून यामुळे अमेरिका अधिकच धोक्यात आलेली आहे, असा दावा पॉम्पिओ यांनी केला.

माईक पॉम्पिओ यांच्या या टीकेला फार मोठे राजकीय महत्त्व असल्याचे दावे केले जातात. काही काळापूर्वी पॉम्पिओ यांनी बायडेन यांना विरोध करीत असताना, माजी राष्ट्राध्यक्ष म्प यांची फार काळ वाट पाहणार नसल्याचे सूचक विधान केले होते. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये पॉम्पिओ यांचाही सहभाग असेल, असे दावे केले जातात. स्वतः पॉम्पिओ यांनी तसे संकेत दिले होते. आपल्याकडे अमेरिकेला देण्यासारखे काहीतरी आहे, हे पॉम्पिओ यांचे विधान म्हणजे राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीची दावेदारी पेश करणारे असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:   

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info