तैवानने चीनचे घुसखोर ड्रोन पाडले

तैपेई – तैवानने चीनच्या घुसखोर विमाने आणि विनाशिकांना धडा शिकविण्याचा इशारा दिला होता. आपला हा इशारा पोकळ नसल्याचे तैवानने दाखवून दिलेे. गुरुवारी तैवानच्या सुरक्षा यंत्रणांनी चीनचे घुसखोर ड्रोन पाडले. चीनच्या किनारपट्टीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर तैवानने ही कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

घुसखोर ड्रोन

चीनच्या 62 लढाऊ व बॉम्बर्स विमानांनी आणि सात विनाशिकांनी बुधवारी तैवानच्या हवाई व सागरी हद्दीजवळून गस्त घातली होती. गेल्या नऊ महिन्यांमध्ये चीनच्या विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीजवळून एवढ्या मोठ्या संख्येने प्रवास करण्याची ही पहिली वेळ ठरते. काही तासांपूर्वीच अमेरिकेने तैवानला सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या संरक्षण साहित्याची विक्री करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे संतापलेल्या चीनने तैवानच्या आखातात विमाने आणि विनाशिका रवाना करून तैवानसह अमेरिकेलाही धमकावल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनला उद्देशून इशारा प्रसिद्ध केला. चीनची लढाऊ विमाने किंवा विनाशिकांनी तैवानच्या हद्दीजवळून प्रवास केलाच, तर स्वसंरक्षणाचा अधिकार असलेल्या तैवानच्या लष्कराकडून त्याला जोरदार उत्तर दिले जाईल, असे तैवानने बजावले होते. वारंवार इशारे देऊनही तैवानच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनच्या लढाऊ विमाने आणि विनाशिकांपर्यंत आपला हा इशारा मर्यादित नाही. तर तैवानच्या हद्दीत दाखल होणाऱ्या चीनच्या ड्रोन्ससाठी देखील हा इशारा असल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते.

याला काही तास उलटत नाही तोच, तैवानच्या किनमेन प्रांतातील ‘लायन’ बेटाच्या हद्दीत चिनी ड्रोनने घुसखोरी केली. चीनच्या फुजिआन प्रांताच्या किनारपट्टीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या तैवानच्या या बेटावरील सुरक्षा यंत्रणेने हल्ला चढवून हे ड्रोन पाडले. सदर चिनी ड्रोन समुद्रात कोसळल्याची माहिती किनमेन कौंटीच्या सुरक्षा कमांडने दिली. ‘या कारवाईनंतर चीनला आपले ड्रोन्स तैवानच्या हद्दीत रवाना करण्याआधी फेरविचार करावा लागेल’, असा इशारा स्थानिक सुरक्षा अधिकारी टिमोथी त्साई यांनी दिला.

घुसखोर ड्रोन

याआधी चीनच्या घुसखोर विमानांना इशारा देण्यासाठी तैवानने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली होती. तसेच चिनी विमानांच्या दिशेने क्षेपणास्त्रे रोखली होती. तरीही तैवानने चीनचे ड्रोन पाडण्याची घटना लक्षवेधी ठरते. त्यातही चीनच्या किनारपट्टीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तैवानच्या बेटावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई करून आपण चीनच्या दडपणासमोर झुकणार नाही, हे सिद्ध केले आहे.

तैवानच्या हवाई तसेच सागरी क्षेत्रात घुसखोरी करताना, चीनच्या हवाई दल व नौदलाकडून तैवानशी संघर्ष पेटणार नाही, याची काळजी घेऊन वेळीच माघार घेतली जाते. याद्वारे थेट युद्ध न करता तैवानला दहशतीखाली ठेवता येईल, असा चीनचा तर्क आहे. मात्र यातून कधीतरी अपघाताने देखील चीनला अपेक्षित नसलेला संघर्ष पेट घेईल. त्यानंतर इथल्या परिस्थितीवर कुणाचेही नियंत्रण उरणार नाही. त्यामुळे चीनने अशारितीने विस्तवाशी खेळ करू नये, असे इशारे जगभरातील विश्लेषक सातत्याने देत आहेत. तैवानने चीनचे ड्रोन पाडून चीनला याची सुस्पष्टपणे जाणीव करून दिल्याचे दिसते.

तैवानी उद्योजक चीनच्या विरोधात तीस लाख ‘वॉरिअर्स’ तयार करणार

घुसखोर ड्रोन

चीनपासून आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे ओळखून तैवानमधील प्रसिद्ध उद्योजकाने जवळपास 30 लाख नागरिकांची फौज उभारण्याची तयारी केली आहे. ‘युनायटेड मॅक्रोइलेक्ॉनिक्स कॉर्प-युएमसी’ या मायक्रोचिप तयार करणाऱ्या कंपनीचे संस्थापक रॉबर्ट त्साओ यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

75 वर्षीय त्साओ यांनी चीनविरोधी संघर्षाच्या सिद्धतेचा भाग म्हणून तब्बल 30 लाख नागरिकांचा समावेश असलेली फौज उभी करण्यासाठी तब्बल तीन कोटी 30 लाख डॉलर्स दान केले आहेत.

चीनने आक्रमण केल्यास तैवानच्या सुरक्षेसाठी 30 लाख जणांना तयार करण्यासाठी त्साओ यांनी हे पाऊल उचलले आहे. तैवानच्या लष्करासाठी सहाय्यक म्हणून या 30 लाख जणांचा वापर करता येईल, अशी माहिती त्साओ यांनी दिली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info