अमेरिकेने युक्रेनला रशियावर मारा करणारी शस्त्रे पुरविल्यास अमेरिका व रशियामध्ये थेट संघर्ष पेट घेईल

- रशियाचा निर्णायक इशारा

मॉस्को – ‘अमेरिकेने युक्रेनला रशियावर मारा करू शकणारी शस्त्रास्त्रे पुरविली, तर अमेरिका युक्रेनच्या युद्धापासून दूर राहू शकणार नाही. त्या परिस्थितीत अमेरिका युक्रेनच्या युद्धाचा भाग बनेल आणि अमेरिकेचा रशियाशी थेट संघर्ष सुरू होईल’, अशा खणखणीत शब्दात रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला समज दिली. रशियाला आपल्या हितसंबंधांचे रक्षण करता येते. आपल्या भूमीचे व सार्वभौमत्त्वाच्या रक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करतानाही रशिया कचरणार नाही. तो रशियाच्या संरक्षणविषयक धोरणाचा भाग आहे, याचीही आठवण उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी करून दिली आहे.

थेट संघर्ष

युक्रेनच्या युद्धाची तीव्रता वाढत चालली आहे. रशियाच्या आक्रमणासमोर युक्रेनची अवस्था बिकट बनलेली असताना, अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांनी युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत एकट्या अमेरिकेनेच युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा पुरवठा केला आहे. मात्र हे देखील पुरेसे नसून अमेरिकेने युक्रेनला थेट रशियावर मारा करू शकणारी शस्त्रे पुरवावी, अशी मागणी केली जात आहे. युक्रेनच्या एका वृत्तवाहिनीवर बोलताना अमेरिकन लष्कराच्या ब्रिगेडियर जनरल मार्क अर्‌‍नॉल्ड यांनी बायडेन प्रशासनाकडे ही मागणी केली होती.

याची गंभीर दखल रशियाने घेतली आहे. युक्रेनला रशियाच्या भूभागावर मारा करू शकणारी शस्त्रे अमेरिकेने पुरविली, तर अमेरिका या युद्धापासून दूर राहू शकणार नाही. यामुळे रशिया व अमेरिका यांच्यात संघर्षाचा भडका उडू शकतो, असे रशियन उपपरराष्ट्रमंत्र्यांनी नेमक्या शब्दात बजावले आहे. रशिया सातत्याने अमेरिकेला या धोक्याची जाणीव करून देत आहे, याकडेही उपपरराष्ट्रमंत्री रिब्कोव्ह यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर युक्रेनमधील आपली उद्दिष्टे साध्य होईपर्यंत रशिया या देशात आपले सैन्य अधिकाधिक पुढे नेत राहिल, असेही रिब्कोव्ह यांनी ठासून सांगितले. युक्रेनमध्ये सत्तापालट घडवून सध्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सरकार उलथविणे हे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचे प्रमुख ध्येय असल्याचे मानले जाते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व इतर प्रमुख नेते देखील हा हेतू साध्य झाल्याखेरीज रशिया माघार घेणार नाही, असे सांगत आहेत.

यामुळेच अमेरिका व नाटोचे सदस्यदेश युक्रेनच्या लष्कराला अधिकाधिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून रशियन सैन्याची आगेकूच थोपविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. यासाठी युक्रेनी लष्कराला रशियाच्या भूभागात खोलवर हल्ले चढवावे लागतील, असा तर्क अमेरिकेचे काही लष्करी अधिकारी व विश्लेषक मांडत आहेत. पण त्याच्या गंभीर परिणामांची जाणीव रशियाकडून करून दिली जात असून रशियन विश्लेषकही अमेरिकेला याच्या विदारक परिणामांचा इशारा देत आहेत.

रशियाचे लष्करी विश्लेषक अलेक्झँडर पेरेंद्झीव्ह यांनी कुठल्याही क्षणी युक्रेनमधील युद्धाचे रुपांतर अमेरिका-नाटोच्या रशियाविरोधी युद्धात होऊ शकेल, असा निष्कर्ष नोंदविला आहे. मात्र रशियाच्या या इशाऱ्यानंतरही अमेरिका युक्रेनच्या आघाडीवर माघार घ्यायला तयार नाही. युक्रेनच्या बरोबरीने नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी हालचाली सुरू करणाऱ्या स्वीडनबरोबर अमेरिकेचा युद्धसराव सुरू आहे. या सरावाचा भाग म्हणून अमेरिकन हवाई दलाच्या बी-५२ हे प्रचंड प्रमाणात बॉम्ब्स्‌‍चा वर्षाव करू शकणाऱ्या महाकाय विमानाने स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या संसदेवरून उड्डाण केल्याची बातमी आली आहे. याद्वारे अमेरिका रशियाला आपल्या या क्षेत्रातील सज्जतेची जाणीव करून देत असल्याचे दिसते.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info