सलग दुसऱ्या दिवशी रशियाकडून युक्रेनी शहरांवर घणाघाती क्षेपणास्त्र हल्ले

- युक्रेनच्या प्रमुख शहरांमधील वीज व पाणीपुरवठा ठप्प

युक्रेनी शहरांवर

मॉस्को/किव्ह – सोमवारी युक्रेनी शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करणाऱ्या रशियाने सलग दुसऱ्या दिवशीही हल्ल्यांची तीव्रता कायम ठेवली आहे. युक्रेनची राजधानी किव्हसह पश्चिम युक्रेनमधील लिव्ह, दक्षिणेकडील ओडेसा तसेच युक्रेनी लष्कराच्या ताब्यात असणाऱ्या झॅपोरिझिआ या शहरांवर रशियन फौजांनी हल्ले चढविले. यात क्रूझ क्षेपणास्त्रांसह लढाऊ विमाने तसेच ड्रोन्सचा वापर करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. हल्ल्यांदरम्यान युक्रेनी लष्कराच्या तळांसह वीजकेंद्रे व इतर पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, रशिया व युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षाचे अनियंत्रित भडक्यात रुपांतर होऊ शकते, असा इशारा रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी दिला आहे.

युक्रेनी शहरांवर

गेल्या आठवड्यात युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी क्रिमिआ व रशियाला जोडणाऱ्या कर्च ब्रिजवर दहशतवादी हल्ला घडविला होता. या हल्ल्याने संतापलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर प्रखर हल्ले चढविण्याचे आदेश दिले. या आदेशांनुसार, रशियन फौजांनी सोमवारी युक्रेनमधील जवळपास 20 शहरांना लक्ष्य करीत 80हून अधिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. या वर्षावाने युक्रेनसह पाश्चिमात्य आघाडीला जबर हादरा बसला आहे. मात्र केवळ एक हादरा देऊन रशिया स्वस्थ बसणार नसून पुढील काळात युक्रेनवर अधिक घणाघाती हल्ले करण्यात येतील, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले होते.

त्याचे प्रत्यंतर मंगळवारी झालेल्या हल्ल्यांमधून दिसून आले. मंगळवार सकाळपासून राजधानी किव्हसह युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये हल्ल्याचा ॲलर्ट देणारे सायरन वाजण्यास सुरुवात झाली. राजधानी किव्ह, लिव्ह, झॅपोरिझिआ, ओडेसा, डिनिप्रो यासारख्या शहरांमध्ये क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ले करण्यात आले. रशियाच्या लढाऊ विमानांनी अनेक लक्ष्यांवर हल्ले केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. मंगळवारच्या हल्ल्यांमध्ये 20पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याचे मानले जाते. या हल्ल्यांमध्ये लष्करी तळांसह वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे युक्रेनमधील आघाडीच्या शहरांसह जवळपास 300 भागांमधील वीजपुरवठा सोमवारपासून ठप्प झाल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनी शहरांवर

गेल्या काही दिवसांपासून युक्रेनसह पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमे रशियाकडील लष्करी क्षमता संपल्याचे व रशियन फौजा जेरीस आल्याचे दावे करीत होत्या. रशियन फौजांनी एकापाठोपाठ घेतलेली माघार व युक्रेनी लष्कराला मिळालेले यश या आधारावर हे दावे करण्यात येत होते. मात्र सलग दोन दिवस युक्रेनी शहरांना भाजून काढत रशियाने आपली लष्करी ताकद युक्रेनसह जगाला दाखवून दिली आहे. तब्बल आठ महिने युक्रेनविरोधात संघर्ष सुरू असताना व धक्के बसले असतानाही रशियाने दाखविलेले हे सामर्थ्य युक्रेनमधील संघर्षाची व्याप्ती अधिक तीव्र करणारी ठरेल, असे आता पाश्चिमात्य विश्लेषक सांगत आहेत.

दरम्यान, रशियाचे रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनीही युक्रेनसह पाश्चिमात्य देशांच्या आघाडीला नवा इशारा दिला. रशिया व युक्रेनमध्ये सुरू असणाऱ्या संघर्षाचे अनियंत्रित भडक्यात रुपांतर होऊ शकते, असे रिब्कोव्ह यांनी बजावले.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info