दक्षिण कोरियाजवळील सागरी क्षेत्रात उत्तर कोरियाकडून दोनशे तोफगोळ्यांचा मारा

सेऊल – अमेरिका आणि दक्षिण कोरियातील वाढत्या लष्करी सहकार्यामुळे अस्वस्थ झालेल्या उत्तर कोरियाने गुरुवारी सलग दोन तास दक्षिण कोरियन सीमेजवळ जवळपास दोनशे तोफगोळ्यांचा मारा केला. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या दहा लष्करी विमानांनी दक्षिण कोरियाच्या हद्दीजवळून गस्त घातली. उत्तर कोरियाच्या या कारवायांनी 2018 सालच्या लष्करी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप दक्षिण कोरियाने केला. तसेच उत्तर कोरियाची कोंडी करण्यासाठी दक्षिण कोरियाने नवे निर्बंध लादले आहेत.

दोनशे तोफगोळ्यांचा मारा

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी अमेरिकेबरोबर आण्विक भागीदारीबाबत चर्चा सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि आण्विक पाणबुडी सेऊलमध्ये तैनात करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष येओल उत्सूक असल्याचा दावा दक्षिण कोरियन वर्तमानपत्राने केला होता. अमेरिका व दक्षिण कोरियन सरकारने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण या बातमीमुळे अस्वस्थ झालेल्या उत्तर कोरियाने गुरुवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास तोफांचा मारा सुरू केला.

दक्षिण कोरियन लष्कराने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर एक ते तीन अशा दोन तासांच्या कालावधीत उत्तर कोरियन लष्कराने किमान 170 तोफगोळ्यांचा मारा केला. दोन्ही कोरियन देशांना विभागणाऱ्या मेरिटाईम बफर झोन अर्थात सागरी प्रतिबंधक क्षेत्रात हे तोफगोळे कोसळले. तर उत्तर कोरियाने किमान 450 तोफगोळ्यांचे हल्ले चढविल्याचा दावा काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी केला आहे. त्याआधी उत्तर कोरियाच्या 10 लष्करी विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाई क्षेत्राजवळून धोकादायकरित्या प्रवास केला होता.

दोनशे तोफगोळ्यांचा मारा

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या कार्यालयाने उत्तर कोरियाच्या या हालचालींवर सडकून टीका केली. 2018 साली दोन्ही कोरियन देशांमध्ये ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मिलिटरी ॲग्रीमेंट-सीएमए’ पार पडला होता. यानुसार दोन्ही कोरियन देशांनी बफर झोन क्षेेत्राचे उल्लंघन न करण्याचेे ठरले होते. पण उत्तर कोरियाने याच क्षेत्रात तोफांचा मारा करून चार वर्षांपूर्वीच्या लष्करी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप दक्षिण कोरिया करीत आहे. तर राष्ट्राध्यक्ष येओल यांनी ‘सीएमए’ करार मोडीत काढावा आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळील लष्करी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी दक्षिण कोरियातील विरोधी पक्षनेते करीत आहेत.

दरम्यान, उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावल्यापासून अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील बैठका वाढल्या आहेत. उत्तर कोरियाच्या या धोक्याविरोधात अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानने संयुक्त लष्करी धोरण राबविण्याचे संकेत दिले आहेत. तसेच या क्षेत्रात प्रगत युद्धनौका, अतिप्रगत लढाऊ विमाने आणि हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याच्या हालचाली वाढविल्या आहेत. अमेरिकेच्या या लष्करी हालचाली उत्तर कोरियासह चीनलाही अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info