अमेरिकेतील लोकशाही अपयशी ठरली आहे

- अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालातील निष्कर्ष

वॉशिंग्टन – अमेरिकेतील नागरिकांचा देशातील लोकशाहीवर विश्वास राहिला नसल्याचा निष्कर्ष अमेरिकी अभ्यासगटाच्या अहवालात नोंदविण्यात आला. नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात 52 टक्के नागरिकांनी अमेरिकेतील लोकशाही व्यवस्था योग्य रितीने काम करीत नसल्याचे म्हटले आहे. यात रिपब्लिकन पार्टीचे समर्थक असलेल्या 68 टक्के नागरिकांचा समावेश असून 40 टक्के सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षाचा भाग आहेत. येत्या 18 दिवसांमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक असून या पार्श्वभूमीवर देशातील अर्ध्याहून अधिक नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास उडणे ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरते.

अमेरिकेतील लोकशाही

जगातील आघाडीची वृत्तसंस्था ‘असोसिएटेड प्रेस’ व शिकागो विद्यापीठातील ‘एनओआरसी’ या गटाने अमेरिकेतील लोकशाही या मुद्यावर नुकतेच व्यापक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात, अमेरिकी नागरिकांमध्ये लोकशाही व्यवस्था तसेच निवडणूक यंत्रणा, मतदान व लोकप्रतिनिधी यांच्याबाबत निराशावादी प्रवृत्ती वाढत असल्याचे समोर आले. गेल्या काही दशकांपासून अमेरिकेत राजकीय ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेने वेग पकडला असून राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीपासून ते अगदी स्कूल बोर्डस्‌‍च्या निवडणुकांपर्यंत ध्रुवीकरण होताना दिसत असल्याकडेे अहवालात लक्ष वेधण्यात आले.

अमेरिकेतील लोकशाही

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला 2020 साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत खतपाणी मिळाले. त्यामुळे अमेरिकी नागरिकांमध्ये नैराश्य येत असून यात दोन्ही पक्षांच्या समर्थकांचा समावेश आहे. लोकप्रतिनिधींच्या निवडीबाबत जेमेतम 25 टक्के नागरिक आशावादी असून 43 टक्के नागरिकांनी तीव्र निराशावादी भावना व्यक्त केल्या आहेत. तर 31 टक्के नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाचे मत व्यक्त करण्यात असमर्थता दर्शविली. 2020 साली झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर लोकशाही प्रक्रियेबद्दल निराशावादी असणाऱ्या नागरिकांच्या संख्येत भर पडत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मतदान तसेच मोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप प्रतिस्पर्धी व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. पण निवडणूक यंत्रणा तसेच न्यायालयाने यासंदर्भातील त्यांचे आक्षेप फेटाळून लावले होते. ट्रम्प तसेच त्यांच्या समर्थकांकडून अद्यापही 2020 सालच्या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात येत असून प्रचारादरम्यान वारंवार त्याचा उल्लेखही करण्यात येतो.

अमेरिकेतील लोकशाही

सध्याचा सत्ताधारी डेमोक्रॅट पक्ष आता अमेरिकन जनतेशी बांधिल राहिलेला नसून हा पक्ष युद्धखोर उच्चभ्रूंच्या दावणीला बांधला गेला आहे, अशी जळजळीत टीका करून अमेरिकन काँग्रेसच्या माजी सदस्य तुलसी गबार्ड यांनी खळबळ माजविली आहे. डेमोक्रॅट पक्षातून बाहेर पडून तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेची लोकशाही या पक्षामुळे धोक्यात आल्याचा इशारा उघडपणे दिला आहे. जगभरात लोकशाहीच्या संरक्षणासाठी सैन्य धाडून त्यासाठी अमेरिकन करदात्यांचा पैसा खर्च करणारे अमेरिकेचे प्रशासन, आपल्या देशात मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याची जोरदार तयारी करीत आहे, या दुटप्पीपणावर गबार्ड यांनी नेमके बोट ठेवले. आपल्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाची वेगवेगळ्या मार्गाने गळचेपी करणे आणि त्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करणे, कुठल्या लोकशाही परंपरेत बसते? असा सवाल करून गबार्ड यांनी बायडेन प्रशासनाची झोप उडविली आहे. अमेरिकन माध्यमांनी गबार्ड यांनी छेडलेल्या मोहिमेला प्रसिद्धी न देण्याचे टाळले असले तरी काही वृत्तसंस्था व सोशल मीडियावरून गबार्ड यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

अमेरिकेतील लोकशाही अपयशी ठरत असल्याच्या जनभावनेला तुलसी गबार्ड यांनी दुजोरा दिल्याचे दिसत असून पुढच्या काळात याचा प्रभाव अमेरिकेच्या राजकारणावर पडण्याची दाट शक्यता आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info