उत्तर कोरियाने अण्वस्त्रांचा वापर केला तर किम जाँग यांच्या राजवटीचा अंत करू

- अमेरिका, दक्षिण कोरियाचा इशारा

वॉशिंग्टन/सेऊल – ‘अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र व सहकारी देशांवरील उत्तर कोरियाचा अण्वस्त्र हल्ला अजिबात खपवून घेणार नाही. उत्तर कोरियाने ही चूक केलीच तर किम जाँग-उन यांच्या राजवटीचा अंत करू’, असा निर्णायक इशारा अमेरिका व दक्षिण कोरियाने दिला आहे. उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया व जपानच्या सागरी हद्दीत क्षेपणास्त्रे डागल्यानंतर दोन्ही देशांनी हा इशारा दिला. पण पुढच्या काही तासात उत्तर कोरियाच्या जवळपास १८० विमानांनी दक्षिण कोरियाच्या हवाईहद्दीजवळून धोकादायक प्रवास केला. त्यानंतर दक्षिण कोरियाने देखील आपली ८० लढाऊ विमाने रवाना करून जोरदार प्रत्युत्तर दिले.

राजवटीचा अंत

अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या व्हिजिलंट स्टॉर्म या युद्धसरावाविरोधात उत्तर कोरियाने नवा इशारा दिला होता. याद्वारे अमेरिकेने आपल्याविरोधात अणुयुद्धाची पटकथा लिहिल्याचा आरोप उत्तर कोरियाने केला होता. अमेरिकेने हा सराव रोखला नाही तर सामर्थ्यशाली उत्तर देण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली होती. महिन्याभरापूर्वी आपल्या आण्विक हल्ल्याबाबतच्या धोरणात बदल करणारा उत्तर कोरिया अणुहल्ला चढवू शकतो, असा इशारा अमेरिका व दक्षिण कोरियातील विश्लेषकांनी दिला होता.

पण अमेरिका व दक्षिण कोरियाने या युद्धसरावाची मुदत वाढविल्यामुळे संतापलेल्या उत्तर कोरियाने गेल्या दोन दिवसांपासून क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावला आहे. बुधवारी उत्तर कोरियाने २३ क्षेपणास्त्रे डागली होती. यातील एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या किनारपट्टीजवळ कोसळले होते. तर गुरुवारी उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रासह एकूण सहा क्षेपणास्त्रे डागली. यापैकी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र दिशा भरकटून जपानच्या सागरी हद्दीत कोसळल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

राजवटीचा अंत

उत्तर कोरियाच्या या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन व दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री जाँग-सूप ली यांच्यात पेंटॅगॉनमध्ये विशेष बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना अमेरिका व दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग-उन यांनी धमकावले. उत्तर कोरियाने अमेरिका आणि मित्र व सहकारी देशांना अणुहल्ला चढविला तर या कम्युनिस्ट देशातील किम जाँग-उन यांची राजवट कायमस्वरुपी संपुष्टात आणली जाईल, अशी धमकी अमेरिका व दक्षिण कोरियाने दिली. पण या इशाऱ्यांची आपल्याला पर्वा नसल्याचे उत्तर कोरियाने पुन्हा दाखवून दिले आहे. शुक्रवारी चार तासांसाठी उत्तर कोरियाच्या १८० लढाऊ विमानांनी भरारी घेतली होती. रडारवर विमानांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आढळल्यानंतर सावध झालेल्या दक्षिण कोरियाने देखील ८० विमाने रवाना केली. यामध्ये दक्षिण कोरियाच्या हवाईदलात सामील झालेल्या ‘एफ-३५’ या स्टेल्थ लढाऊ विमानांचाही समावेश होता. तसेच अमेरिकेबरोबरच्या हवाईसरावात सहभागी झालेल्या विमानांनाही तयारीत राहण्यासाठी अलर्ट देण्यात आला होता.

दरम्यान, अमेरिका व दक्षिण कोरियातील युद्धसरावानंतर निर्माण झालेला हा तणाव कमी होण्याची शक्यता नाही. अमेरिका या युद्धसरावावर अडून बसली आहे व दक्षिण कोरियातील युन सूक-येओल यांचे सरकार अमेरिकेच्या निर्णयाला अनुमोदन देत आहेत. तर उत्तर कोरिया दररोज नव्या कारवाया करून येथील तणावात भर टाकत आहे.

English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info