युक्रेनने ‘डर्टी बॉम्ब’चा वापर करण्याचा कट आखला आहे

- अमेरिकेतील रशियन राजदूतांचा आरोप

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – ‘युक्रेनच्या राजवटीने डर्टी बॉम्बचा वापर करण्याचा किंवा अणुप्रकल्पात एखादा अपघात घडविण्याचा कट आखला आहे. अशा चिथावणीखोर घटनांच्या माध्यमातून अमेरिका व नाटोला रशियाविरोधातील युद्धात उतरण्यास भाग पाडण्याचे युक्रेनचे इरादेे आहेत’, असा गंभीर आरोप रशियाचे अमेरिकेतील राजदूत ॲनातोली ॲन्टानोव्ह यांनी केला आहे. रशिया वारंवार या धोक्याकडे लक्ष वेधत असतानाही अमेरिकेसह पाश्चिमात्य देश याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा ठपका ॲन्टानोव्ह यांनी ठेवला. यापूर्वी रशियाचे संरक्षण तसेच परराष्ट्रमंत्र्यांनीही युक्रेनच्या ‘डर्टी बॉम्ब’च्या कारस्थानाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र युक्रेनमध्ये धाडण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पथकाने अशा प्रकारच्या कोणत्याही हालचाली आढळल्या नसल्याचे सांगून रशियाचे दावे फेटाळले होते.

राजदूत ॲन्टानोव्ह यांनी रशियन दूतावासाच्या सोशल मीडिया चॅनलवर प्रसिद्ध केलेल्या लेखात युक्रेनच्या कटाबाबत माहिती दिली. ‘नजिकच्या काळात आपल्याला आण्विक किरणोत्सर्गाचा धोका सहन करावा लागणार आहे. युक्रेनची राजवट डर्टी बॉम्बचा स्फोट घडविण्याची योजना आखत आहे. एका छोट्या अण्वस्त्रामुळे जितकी हानी होऊ शकते तितकी हानी या डर्टी बॉम्बमुळे होईल. स्फोटामुळे हजारो मीटर्सच्या भागात किरणोत्सर्गी घटक पसरतील. किरणोत्सर्ग झालेला परिसर पुढील ३० ते ५० वर्षांसाठी प्रतिबंधित क्षेत्र असेल’, असा इशारा रशियन राजदूतांनी दिला.

‘डर्टी बॉम्ब विकसित करून त्याचा स्फोट घडविण्याची जबाबदारी युक्रेनमधील दोन संस्थांवर सोपविण्यात आली आहे. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. युक्रेनकडे डर्टी बॉम्ब तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा तसेच शास्त्रीय व तांत्रिक क्षमता आहे. आण्विक स्फोट घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या युरेनियम-२३५ व युरेनियम-२३९चा साठाही त्यांच्याकडे आहे’, याकडेही ॲन्टानोव्ह यांनी लक्ष वेधले. डर्टी बॉम्बव्यतिरिक्त युक्रेनच्याच हद्दीतील अणुप्रकल्पामध्ये घातपात घडविण्याचे प्रयत्नही राजवटीकडून सुरू असल्याचा दावा रशियन राजदूतांनी केला.

युक्रेनच्या या हालचालींमुळे ‘चेर्नोबिल’ किंवा ‘फुकुशिमा’सारखी भयावह घटना घडू शकते. रशिया या मुद्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे वारंवार लक्ष वेधत आहे. मात्र रशियाकडून देण्यात येणारी माहिती चुकीची व तथ्यहीन असल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा इशारा रशियन राजदूतांनी दिला.

डर्टी बॉम्ब किंवा अपघाताच्या माध्यमातून चिथावणी देऊन युक्रेन रशियाच्या अणुहल्ल्याला बळी पडल्याचे नाटक उभे करायचे आहे. अमेरिका व नाटोला रशिया-युक्रेन युद्धात खेचण्याचे इरादे यामागे असल्याचा आरोप रशियन राजदूतांनी लेखातून केला. युक्रेनच्या पाठीशी उभे राहून अमेरिका देखील आण्विक दहशतवादाची समर्थक बनल्याची आरोप ॲन्टानोव्ह यांनी केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info