युक्रेनकडून रशियाच्या हवाईतळावर तिसरा ड्रोन हल्ला

- हल्ल्यासाठी युक्रेनला सहाय्य केले नसल्याचा अमेरिकेचा खुलासा

मॉस्को/किव्ह/वॉशिंग्टन – युक्रेनने रशियाच्या हवाईतळावर सलग तिसरा हल्ला करून रशियाला नवा धक्का दिला. सोमवारी ‘एन्गेल्स’ व ‘रायझान’ या दोन तळांवर चढविलेल्या हल्ल्यांनंतर मंगळवारी युक्रेनी ड्रोन्सनी ‘कुर्स्क’ शहरातील हवाईतळाला लक्ष्य केले. या हल्ल्यात तळावरील इंधनसाठ्यांचा स्फोट झाला असून तळाचे थोडे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. रशियाने ड्रोन हल्ला झाल्याचे मान्य केले आहे. तर रशियात होत असलेल्या हल्ल्यांसाठी अमेरिकेने युक्रेनला कोणत्याही प्रकारचे सहाय्य केले नसल्याचा खुलासा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून करण्यात आला. गेल्या आठवड्यात नाटो सदस्य देशांच्या नेत्यांनी युक्रेनला रशियन भूमीत हल्ले करण्याची परवानगी द्यायला हवी अशी मागणी केली होती. नाटोच्या बैठकीत युक्रेनला ‘पॅट्रियॉट मिसाईल्स’ व लढाऊ विमाने पुरविण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली होती.

रशियाच्या हवाईतळावर

या पार्श्वभूमीवर, सलग दोन दिवस रशियातील हवाईतळांना लक्ष्य करून युक्रेनने आपल्याकडे रशियन भूमीत खोलवर हल्ले करण्याची क्षमता असल्याचे संकेत दिले आहेत. युक्रेनने सलग दोन दिवसात तीन हल्ले चढविल्याने रशियन यंत्रणांसमोरील चिंता वाढल्याचेही सांगण्यात येते.

रशियाच्या हवाईतळावर

सोमवारी रशियातील ‘एन्गेल्स’ व ‘रायझान’ या दोन तळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान पाच जणांचा बळी गेल्याचे समोर आले होते. ‘एन्गेल्स’ तळावर झालेल्या हल्ल्यात दोन रशियन बॉम्बर्स विमानांचे नुकसान झाले. तर रायझान तळावर मोठ्या फ्युएल टँकरचा स्फोट होऊन प्रचंड आग भडकली होती. त्यानंतर मंगळवारी युक्रेन सीमेपासून जवळपास 80 मैलांवर असणाऱ्या कुर्स्क शहरातील हवाईतळावर हल्ला झाला. हल्ल्यानंतर प्रचंड मोठी आग लागल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. या हल्ल्यांसाठी युक्रेनने रशियन बनावटीच्या ‘टीयू-141’ ड्रोन्सचा वापर केल्याचा दावा करण्यात येतो.

रशियाच्या हवाईतळावर

रशियन शहरांमधील तळांवर हल्ले झाल्याचे रशियन अधिकारी तसेच यंत्रणांनी मान्य केले आहे. हे हल्ले दहशतवादी हल्ले असल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. रशियन तळांवरील ‘बॉम्बर्स’ना लक्ष्य करण्यासाठी हल्ले चढविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ले युक्रेनकडून करण्यात आले असले तरी युक्रेनने त्याची उघड कबुली दिलेली नाही. तर युक्रेनला सर्वाधिक शस्त्रसहाय्य पुरविणाऱ्या अमेरिकेने रशियन तळांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

रशियाच्या हवाईतळावर

‘अमेरिकेने युक्रेनला केलेले शस्त्रसहाय्य बचावासाठी आहे. युक्रेनने त्यांच्या सीमेपलिकडे हल्ले चढविण्यासाठी काही ही शस्त्रे पुरविण्यात आलेली नाहीत. युक्रेनने आपल्या सीमेपलिकडील भागात हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेने प्रोत्साहन दिलेले नाही’, असा खुलासा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी केला. युक्रेनने यापूर्वी रशियाच्या हद्दीतील क्रिमिआ, बलगोरोद, ब्रिआंस्क या तळांवरही हल्ले चढविले होते.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info