रशिया-युक्रेन युद्धाचे रुपांतर सर्वंकष जागतिक संघर्षात होईल

- नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा इशारा

ऑस्लो/मॉस्को/वॉशिंग्टन – ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये सुरू केलेले युद्ध नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आहे. या युद्धाचे रुपांतर रशिया विरुद्ध पाश्चिमात्य देश अशा व्यापक संघर्षात होऊ शकते’, असा गंभीर इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला. रशिया-युक्रेन युद्धाचे जागतिक संघर्षात रुपांतर होऊ नये म्हणून नाटो सातत्याने प्रयत्न करीत असल्याचा दावाही स्टॉल्टनबर्ग यांनी केला. नाटो प्रमुख हा दावा करीत असतानाच अमेरिकेने युक्रेनला 27.5 कोटी डॉलर्सचे नवे शस्त्रसहाय्य घोषित केले आहे. या सहाय्यावर रशियाने तीव्र नाराजी दर्शविली असून अमेरिका युक्रेनमधील संघर्षात अधिक तेल ओतून भडका उडवित आहे, अशी घणाघाती टीका रशियाच्या परराष्ट्र विभागाने केली.

युद्धाचे रुपांतर

रशिया व युक्रेनमध्ये कडक हिवाळा सुरू झाला असला तरी दोन देशांमधील संघर्ष अद्यापही थंडावण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट दोन्ही देश जास्तीत जास्त भागावर ताबा मिळविण्याचे प्रयत्न करीत असून रशियाने आपले हल्ले अधिक प्रखर करण्यास सुरुवात केली आहे. डोनेत्स्क प्रांतात रशियाची आगेकूच सुरू असून खार्किव्ह, खेर्सन या भागांमध्येही सातत्याने हल्ले करण्यात येत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनने रशियन भूभागातील शहरे तसेच तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नाटोच्या प्रमुखांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

युद्धाचे रुपांतर

नॉर्वेतील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्टॉल्टनबर्ग यांनी, युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक भयावह होत चालल्याची कबुली दिली. ‘युक्रेनमध्ये भयंकर संघर्ष सुरू आहे. त्यात चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याचे स्वरुप अधिक भयावह रुप धारण करील. याचे रुपांतर नाटो व रशियातील सर्वंकष संघर्षात होऊ शकते’, असा इशारा नाटोच्या प्रमुखांनी दिला. सर्वंकष युद्धाची शक्यता आहे आणि युरोपातील अधिकाधिक देश युद्धात पडू नयेत यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील, असेही स्टॉल्टनबर्ग यांनी यावेळी सांगितले.

युद्धाचे रुपांतर

नाटोचे प्रमुख सर्वंकष युद्धाचा इशारा देत असतानाच अमेरिकेने युक्रेनला नव्या शस्त्रसहाय्याची घोषणा केली आहे. 27.5 कोटी डॉलर्सच्या या सहाय्यात ‘हायमार्स सिस्टिम’साठी रॉकेट्ससह ‘अँटी ड्रोन सिस्टिम’ तसेच हवाईसुरक्षा यंत्रणांचा समावेश आहे. अमेरिकेने गेल्या 11 महिन्यात युक्रेनला सुमारे 20 अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविले आहे. पुढील वर्षात युक्रेनला ‘पॅट्रियॉट’ क्षेपणास्त्रे, प्रगत क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तसेच ‘क्लस्टर म्युनिशन्स’ पुरविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेतही अमेरिकी सूत्रांनी दिले आहेत. अमेरिकेकडून मिळणाऱ्या या शस्त्रसहाय्याच्या पार्श्वभूमीवर, युक्रेन या शस्त्रांच्या सहाय्याने क्रिमिआत हल्ले करु शकतो, असा दावा युक्रेनच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. अमेरिकेनेही रशियन हद्दीत हल्ले करण्यासाठी युक्रेनला परवानगी दिल्याचे वृत्त ब्रिटीश माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.

अमेरिकेच्या या शस्त्रसहाय्यावर रशियाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमेरिकेकडून देण्यात येणारे शस्त्रसहाय्य युक्रेनच्या संघर्षात अधिकाधिक तेल ओतणारे ठरत आहे. अमेरिकेला युक्रेनमधील संघर्ष 2025 सालापर्यंत चालू ठेवायचा आहे. त्यांनी जाहीर केलेल्या योजनांमधून याला दुजोरा मिळत आहे’, अशी टीका परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी केली.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info