युक्रेनमधील संघर्षामुळे अमेरिका व रशियातील अणुयुद्धाची शक्यता वाढली

- माध्यमे व विश्लेषकांचा दावा

मॉस्को/वॉशिंग्टन – आण्विक निःशस्त्रीकरणासंदर्भातील आंतरराष्ट्रीय करार व त्यावर आधारलेली यंत्रणा कोसळली असून नजिकच्या काळातही त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. त्याचवेळी रशिया व अमेरिकेसारखे अण्वस्त्रसज्ज देश टोकाच्या परिस्थितीत अण्वस्त्रांचा वापर करण्याचे इशारेही सातत्याने देत आहेत. या पार्श्वभूमीवर, जगातील दोन आघाडीचे देश असलेल्या रशिया व अमेरिकेत अणुयुद्ध पेटण्याची शक्यता वाढल्याचे दावे माध्यमे तसेच विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही अणुयुद्धाचा धोका सातत्याने वाढतो आहे व हा वाढता धोका नाकारणे चुकीचे ठरेल, असे बजावले होते. रविवारी रशियाच्या संरक्षण विभागाने अण्वस्त्रवाहू ‘ॲव्हनगार्ड हायपरसोनिक मिसाईल’ची रेजिमेंट कार्यरत झाल्याचे जाहीर केले.

अणुयुद्धाची शक्यता

रशियाच्या ‘ऑरेनबर्ग रिजन’ भागात ही मिसाईल रेजिमेंट तेनात करण्यात आली आहे. ‘ॲव्हनगार्ड हायपरसोनिक मिसाईल’चा वेग ध्वनीच्या २७ पट असून पृथ्वीवरील कोणतेही लक्ष्य ३० मिनिटांच्या आत भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असल्याचे सांगण्यात येते. नव्या क्षेपणास्त्राच्या तैनातीमुळे रशियाच्या ‘स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’ची युद्धक्षमता अधिकच वाढेल, असा दावाही रशियाच्या संरक्षण विभागाने केला. गेल्याच आठवड्यात रशियाने राजधानी मॉस्कोनजिक असलेल्या एका तळावर ‘यार्स’ अण्वस्त्रे तैनात करीत असल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ प्रसिद्ध केले होते.

अणुयुद्धाची शक्यता

काही दिवसांच्या अवधीत ‘यार्स’ व ‘ॲव्हनगार्ड’ची झालेली तैनाती आणि त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ‘प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक पॉलिसी’बाबत केलेले वक्तव्य या घटनांनी अणुयुद्धाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येत असल्याचे दिसत आहे. रशियासह अमेरिका तसेच युरोपमधील माध्यमे व विश्लेषकांमध्ये यासंदर्भातील शक्यतांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. रशिया-युक्रेन संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपल्या ‘न्यूक्लिअर फोर्सेस’ना अलर्ट राहण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर अणुयुद्धाबाबत चर्चेला सुरुवात झाली होती.

अणुयुद्धाची शक्यता

रशियाकडून येणाऱ्या आक्रमक वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना अमेरिका व ब्रिटननेही आक्रमक भूमिका घेतली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, आवश्यकता भासल्यास अमेरिका अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, असे वक्क्व्य केले. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान व माजी परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनीही, आपण अण्वस्त्रांचा वापर करु शकतो, असे बजावले होते. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही, रशियाने अणुहल्ल्याबाबत पाऊल उचलल्यास अमेरिका सर्वसामर्थ्यानिशी प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही, रशियाच्या हल्ल्याची वाट न पाहता नाटो देशांनी रशियाची आण्विक क्षमता उद्ध्वस्त करावी अशी आक्रमक मागणी केली होती.

रशियन अभ्यासक कॉन्स्टन्टिन ब्लॉखिन यांनी, रशिया व अमेरिकेदरम्यान अणुयुद्ध झाल्यास पूर्ण जगालाच त्याचे परिणाम भोगावे लागणार असून सर्वजण काही ना काही गमावतील, असे बजावले. मात्र त्याचवेळी युक्रेनसाठी हे दोन देश अणुयुद्ध सुरू करतील ही शक्यता नाकारली आहे. तर, रशियाला युक्रेनमधील मोहीमेत यश मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यास पाश्चिमात्य आघाडी अणुहल्ल्याच्या पर्यायावर विचार करु शकते असा दावा रशियन विश्लेषक व्लादिमिर वॅसिलिव्ह यांनी केला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info